म्हापसा - गोव्यात स्पा व मसाज पार्लराच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असली तरी वाढत असलेल्या या गैरप्रकारांची लोकांकडून दखल घेतली जात आहे. त्यासाठी लोकांकडून कारवाई करण्याची मोहीम सुद्धा सुरू झाली आहे. हणजूण पोलीस हद्दीत येत असलेल्या हडफडे भागात मागील चार दिवसात दोन बेकायदेशीर पार्लर लोकांनीच हस्तक्षेप करुन बंद पाडण्याचे प्रकार घडले आहेत.
हडफडे पंचायत क्षेत्रातील फूट स्पा व मसाज पार्लरात सुरू असलेल्या बेधुंद व बेकायदेशीर प्रकारावर कंटाळून त्या परिसरातील लोकांनी हस्तक्षेप करुन शनिवारी तो बंद पाडला होता. त्यानंतर सोमवारी याच परिसरात सुरू असलेल्या अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका पार्लरात सुरू असलेल्या बेकायदेशीर अनैतिक व्यवसायाला सुरू असल्याच्या संशयावरुन त्याला टाळे ठोकले. केलेल्या कारवाईत त्या स्पामधून मोठ्या प्रमाणावर गर्भनिरोधक साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले होते.
सदरच्या स्पामध्ये रात्री उशीरापर्यंत संगीत रजनीसोबत इतर गैरव्यवहार चालत असल्याचा संशय स्थानिक लोकांना होता. मात्र यावर वारंवार पोलिसांना त्याची माहिती देवून सुद्धा त्यांच्याकडून कारवाई होत नव्हती. त्यामुळे लोकांनी स्पाच्या परिसरात जमायला सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी त्यात प्रवेश करुन स्पाची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी अनेक गैरप्रकार आढळून आल्याने नंतर त्याला टाळे ठोकले.
मागील आठवड्यात अशाच प्रकारच्या बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या स्पात लोकांनी प्रवेश करुन त्याची तोडफोड केली होती. पर्यटकांना लुबाडणे, त्यांची फसवणूक करणे त्यांना लुबाडणे अशा प्रकारच्या विविध कारणास्तव ही कारवाई लोकांकडून करण्यात आलेली. त्यात येणाऱ्या पर्यटकांकडून आगावू रक्कम घेवून नंतर त्यातून त्यांना हाकलून देण्यात येत होते. घडत असलेल्या प्रकारावर एका पर्यटकांने आवाज काढल्यानंतर त्याला सहकार्य करण्यास लोक सरसावले होते. लोकांनी केलेल्या कारवाई नंतर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करुन संबंधितांना अटक केली होती. याच स्पात सुरु असलेल्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांकडून यापूर्वी सुद्धा कारवाई करण्यात आली होती.
पंचायत क्षेत्रातील या प्रकाराची लोकांनी गंभीर दखल घेतली असून कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर व इतर ग्रामस्थांनी हणजूण पोलिसांनी भेट घेवून वाढत असलेल्या अनैतिक व्यवसायावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. केलेल्या मागणीची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.