पणजी : राजकारण्यांची पोलीस प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवेळी सर्वाधिक ढवळाढवळ असते, असे निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी शनिवारी येथे सांगितले. ‘लोकमत गोवन आॅफ द इयर’ पुरस्कार वितरण सोहळ््यात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांची मुलाखत घेतली. पोलीस प्रशासनातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाविषयीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आपल्या वेळी राजकीय हस्तक्षेप हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत जाणवत होता. राजकारण्यांना आपल्या पसंतीचा अधिकारी आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात हवा होता. त्या वेळी अनेकवेळा त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करून तोडगा काढावा लागत होता; परंतु काही वेळा आपण स्पष्टपणे सांगूनही टाकले होते की त्यांच्या मर्जीनुसार बदल्या केल्यास संबंधित पोलीस स्थानक क्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपण घेणार नाही. आपल्या काळातील राज्यकर्त्यांविषयी बोलताना, त्या वेळी राज्यकर्ते इतके वाईट नव्हते, असे त्यांनी सांगितले. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या काळात कधी पोलीस प्रशासनात हस्तक्षेप झालेला नाही, असेही ते म्हणाले.भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सक्रीय असलेले रिबेरो यांनी भ्रष्टाचाराचे प्रमाण हे वरिष्ठ पातळीवर कमी झाल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराला वाव देत नाहीत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कनिष्ठ पातळीवर भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याविरोधातील मोहिमेत आपण स्वत: सक्रीय असल्याचे ते म्हणाले. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही छोटेखानी प्रकट मुलाखत झाली. (प्रतिनिधी)
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत राजकीय हस्तक्षेप
By admin | Published: May 23, 2016 5:01 AM