पणजी - गोव्यात अकरा दिवसांच्या गणेशाचे विसर्जन गुरुवारी मोठ्या थाटामाटात करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करण्यामधील गोमंतकीयांचा उत्साह वाढतच असून, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मिरवणुकीत यंदा जास्त लोक सहभागी झाले. विशेष म्हणजे विविध भागांमध्ये राजकीय नेत्यांनीही सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेणे, विसजर्नावेळी त्यांच्या मिरवणुकांमध्ये भाग घेणे याबाबत यावेळी बरीच सक्रियता दाखवली.केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक हे यंदा पूर्ण गणेशोत्सव काळात गोव्यातच होते. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा केलाच,शिवाय स्वत: गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन त्या मूर्तीचे विसर्जन करतानाचे फोटोही काढून सोशल मिडियावर शेअर केले. नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन करून आल्यानंतर नाईक हे स्वत: होडी वल्हवतात, असे दाखवून देणारा व्हीडीओही नाईक यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावर बरीच चर्चा रंगली आहे. नाईक यांनी म्हापसा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेतलेच, शिवाय प्रथमच पणजी पोलीस स्थानकालाही त्यांनी भेट दिली व तेथील गणेशमूर्तीचे दर्शन घेतले.कळंगुटचे आमदार व राज्याचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनीही कळंगुटमधील सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेतले. श्री शांतादुर्गा मंदिरातील सार्वजनिक गणेश मूर्तीच्या विसर्जनावेळी मंत्री लोबो यांनी जिल्हा पंचायत सदस्यांसोबत विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोठंबी गावातील निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी मंत्री लोबो आणि मुख्यमंत्री सावंत यांनी पारंपारिक वाद्ये वाचविली व गणेशाची आरती केली. सर्वधर्मियांमधील सलोखा गणेशोत्सवासारख्या सणांमुळे वाढीस लागतो, अशी प्रतिक्रिया मंत्री लोबो यांनी व्यक्त केली.सार्वजनिक गणेशोत्सवांचे दर्शन घेण्याबाबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हेही मागे राहिले नाहीत. त्यांनीही म्हापसा येथील गणेशोत्सवाला भेट दिली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान ज्येष्ठ आमदार लुईझिन फालरो यांनीही सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेतले. राज्याचे नगर नियोजन मंत्री बाबू कवळेकर हेही केपेतील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी झाले.
गोव्यात गणपती विसर्जनावेळी राजकीय नेतेही सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 3:43 PM