जो जीता वही सिकंदर! भाजपालाच आता 'भिवपाची गरज आसा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2024 12:27 PM2024-06-23T12:27:42+5:302024-06-23T12:28:35+5:30

ख्रिस्ती समाजाला धर्माच्या बंधनात अडकवून त्यांची बौद्धिक कुवत न समजण्याचा मूर्खपणा भाजपने करू नये.

political overview of congress defeated bjp in south goa lok sabha election 2024 | जो जीता वही सिकंदर! भाजपालाच आता 'भिवपाची गरज आसा'

जो जीता वही सिकंदर! भाजपालाच आता 'भिवपाची गरज आसा'

हिरा प्रकाश खरंगटे, कुडचडे

'भिवपाची गरज ना' असं नेहमी दुसऱ्यांना दिलासा देणाऱ्या सावंतांना स्वतःच 'भिवपाची गरज आसा' असं वाटू लागलं आहे. लांडगा आला रे आला.. नेहमीच यशस्वी होत नाही, प्रत्येक निवडणुकीला गगनाला गवसणी घालणारी आश्वासनं देणं आणि जिंकल्यावर तो मी नव्हेच अशा अविर्भावात वावरणं लोक ओळखू लागले आहेत.

लोकशाही, राजकारण, निवडणुका या सगळ्याचा अर्थ केवळ अदानी - अंबानीलाच नव्हे तर सर्वसामान्य माणसालासुद्धा मानाने, स्वाभीमानाने जगता यावं आणि स्वतःच्या कष्टाचं पोटभर खाता यावं, एवढाच आहे, त्याहून वेगळा असा काही नाही. पूर्वी जिंकण्यासाठीं युद्धे होत. निवडणुका या सुद्धा जिंकण्यासाठी केलेली लुटुपुटुची लढाईच आहे. आमदार, खासदार होणं ही काही पास केलेली पदवी परीक्षा नाही. चांगला अभ्यास केला आणि चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झालो, अशातला भाग नाही. ही सगळी जनतेच्या मर्जीची किमया आहे. यात उमेदवार म्हणून उभा राहिलेल्याची जी जबाबदारी असेल त्याहून किंचित तसूभर जास्तच जबाबदारी त्याला निवडणाऱ्या जनतेची असते. म्हणूनच लोकांनी निवडून दिलं तरच आपण जिंकू याची जाणीव ज्या उमेदवाराला असते- म्हणण्यापेक्षा असायलाच हवी तोच सगळं जनतेच्या कलान घेतो. त्याच्या गरजांना, अडचणींना प्राधान्य देतो आणि बाजी मारून या क्षेत्रात बराच काळ तगही धरू शकतो.

यंदाची म्हणजे २०२४ ची लोकसभा निवडणूकही सर्वार्थानं वेगळी ठरली, असंच म्हणावं लागेल. जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाला नैतिक पराभवाची आणि जिचं अस्तित्वच शून्य करू असा ढींडोरा पिटला गेला त्याच काँग्रेसला चाहत्यांनी उचलून धरल्याची जाणीव करून देणारी ठरली. जिला वैभवशाली इतिहास आहे, परंपरा आहे, चाहत्यांचं प्रेम आहे, तिला ज्या नेटानं नेस्तानाबूत करायचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट जोराने ती तावून सुलाखून पुनरुज्जीवित होईल हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय आपल्या देशाचा इतिहास पुढेच सरकत नाही, काँग्रेसला नेस्तानाबूत करणं म्हणजे आपल्या जन्मजात्या आई वडिलांनाच विसरण्यासारखं आहे. 

काही गोष्टी या डोकं शांत ठेवूनच करायच्या असतात. ज्या त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांनी केल्या. आता वाटतं आजच्यासारखे भडक माथेफिरू डोक्याचे नेते त्यावेळी असते तर कदाचित आपला भारत आतापर्यंत स्वतंत्र झालाही नसता, यावेळी फळाची अपेक्षा न धरता सलग दहा वर्ष शांत चित्तानं एकाकी झुंज देणाऱ्या राहुल गांधींना लोकांनी हृदयात स्थान दिलं आहे आणि यावेळी पंतप्रधान मोदींची चार लाख ऐंशी हजारांवरून एक लाख बावन्न हजारांवर झालेली घसरण.. त्यांची लोकप्रियता घसरत चालल्याची चिन्हे दाखवत आहे, हेही सिद्ध झालं आहे.

दक्षिण गोव्यात पल्लवीचा झालेला पराभव हा केंद्रात एनडीए सरकार आल्याच्या भाजपाच्या आनंदावर विरजण घालणारा ठरला. दक्षिणेत पल्लवीच काय कुठलाही भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. ही गोष्टी सर्वसामान्य माणसालाही जाणवत होती. मग यांना ती कशी जाणवली नाही, देव जाणे. म्हणूनच दक्षिण गोव्यातील काँग्रेसच्या विजयासाठी चर्चला, ख्रिस्ती समाजाला कारणीभूत ठरविणे वगैरे केवळ अपयश सावरण्यासाठी सरकारने केलेली सारवासारव वाटते. भाजपाच्या या राज्यात जनता सुखी नाही हे एव्हाना सावंतांच्या लक्षात यायला हवं होतं दक्षिण गोव्याची जनताही अंगूठाछाप नाही, बिकावू नाही. कुणाच्याही प्रलोभनांना बळी न पडणारी आणि स्वतःच्या डोक्यानं विचार करणारी सुशिक्षित, बुद्धीमान जनता आहे. ओपिनियन पोलवेळी गोव्याचं 'गोंयकारपण' शाबूत ठेवलं. राखून ठेवलं ते याच सुशिक्षित जनतेनं. म्हणूनच आज आपण 'गोंयकार' म्हणून अभिमानानं मिरवतो. खिश्चन समाज हा शिकलेला आणि देशाचं हीत जाणणारा आहे. गोवा स्वतंत्र झाल्यावर लागलीच राष्ट्रीय प्रवाहात समाविष्ट झालेली अशीही जनता आहे.

भाजपाच्या अपयशामागील कारणं तशी अनेक आहेत आणि याहून खूप वेगळीही आहेत. लोकांसाठी काहीही न करता सुद्धा लोक भाजपला मते देतील, कारण भाजपशिवाय पर्यया नाही हा भाजपा कार्यकर्त्यांचा आणि खुद्द सावंत-तानावडेंचा फाजील आत्मविश्वास त्यांना नडला. म्हणजेच मतदारांनी त्यांनी गृहीत धरलं विजय सहज मिळेल. हा गैरसमज करून घेतला कारण त्यांच्या बोलण्यातून तरी तसं दिसत होतं आणि लोकांना मूर्ख बनविण्यात ते स्वतःच मूर्ख ठरले. खरं तर या दहा वर्षात भ्रष्टाचाराचा झालेला कळस, सरकारचा गलथान कारभार, वाढती बेरोजगारी, कुठल्याही धंद्यात आता राम राहिला नाही अशी परिस्थिती आणि आपल्या टुमदार शहरांची, गावांची वाळवी लागल्यासारखी चालवलेली पडझड हीच भाजपाची लोकप्रियता घटण्याची प्रमुख कारणं आहेत. शिवाय परिस्थितीची जाणीव न ठेवता मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष तानावडेंनी केलेली बेफाम विधानंही यात भर घालून गेली, पल्लवीला पन्नास हजारांची लीड मिळेल.. नंतर वीसवर आले.. पुढल्या पन्नास वर्षात गोव्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असेल.. या वाक्यातून दिसणारा सत्तेचा माज जनतेला रुचला नाही, हे दिसून आले.

या निवडणुकीतील आणखी एक ठळक गोष्ट म्हणजे मोदीशिवाय देशाला पर्याय नाही, ही मोदींची प्रतिमा आता धूसर बनत चालल्याची चिन्हं दिसत आहेत. मोदी कधी कुणाला आपलेसे वाटलेच नाहीत. कारण ते कधी कुणाविषयी चारशब्द प्रेमाचे कौतुकाचे बोललेच नाहीत. त्यांच्याविषयी वाटतो तो दरारा आणि अनामिक भीती. या दहा वर्षात सामान्य जनतेविषयी विचार करण्यापेक्षा नेहरू-गांधी घराण्याला अपशब्द बोलण्यातच मोदींनी आपली शक्ती पणाला लावली आणि राहुलची 'पप्पू' अशी प्रतिमा करून त्यांची टवाळी करण्यात धन्यता मानली. दिवसातून पाच वेळा पोषाख बदलून स्वातंत्र्य मिळत नसतं आणि दुसऱ्याची निंदानालस्ती करून माणूस मोठा होत नसतो. उलट लोकांच्या नजरेत दिवसेंदिवस खुजा होत जातो, हे सगळं असंच झालं असेल यात शंका नाही. राहुल गांधींचं कुणाशीही देणं घेणं नाही, तरी त्यांच्याविषयी जनतेच्या मनात कुठंतरी सॉफ्टकॉर्नर आहेच. कारण काँग्रेसचं आणि जनतेचं तसं मनाचं नातं आहे. तशी बरी वाईट माणसं सगळ्याच पक्षात असतात, तरीपण कधीतरी या पक्षानं देशासाठी निःस्वार्थीपणे खूप काही केलेलं आहे आणि या पक्षाची धुरा आता राहुल गांधींच्या हाती आहे.

आता या पुढील वाटही भाजपासाठी दिसते तितकी सहज आणि सोपी नाही, हाच या निकालाचा अर्थ आहे. आणि 'भिवपाची गरज ना' असं नेहमी दुसऱ्यांना दिलासा देणाऱ्या सावंतांना स्वतःच 'भिवपाची गरज आसा' असं वाटू लागलं आहे. लांडगा आला रे आला.. नेहमीच यशस्वी होत नाही, प्रत्येक निवडणुकीला गगनाला गवसणी घालणारी आश्वासनं देणं आणि जिंकल्यावर तो मी नव्हेच अशा अविर्भावात वावरणं लोक ओळखू लागले आहेत. त्यामुळे जिंकायचं असेल तर जनतेच्या अडचणी आधी समजून घ्याव्या लागतील आणि पक्षाची नव्यानं बांधणी वगैरे सोपस्कार नंतर करावे लागतील. प्रत्येक वेळी मूर्ख बनणं जनतेनं आता सोडून दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या चुकांचं खापर पुन्हा पुन्हा चर्च आणि धर्मगुरुंवर फोडणं सर्वात आधी बंद करावं लागेल, कारण सूज्ञ शहाणी जनता कुणाच्या सांगण्यावरून मतदान करत नाही. स्वतःच्या मनाचा कौल शिरसावंद्य मानते. एकदा जे होऊन गेलं आणि कायद्यानं मान्य केलं त्यावर पुन्हा पुन्हा ताशेरे ओढून काय फायदा? कारण शेवटी "जो जीता वही सिकंदर!"

या निवडणुकीत एक गोष्ट ठळक दिसून आली ती म्हणजे लोकांचं काँग्रेसवरील प्रेम. जिथ प्रेम असतं तिथं दिखाव्याची गरज भासत नाही. म्हणूनच या लोकांना काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांच्या सभेची गरजच भासली नाही. काँग्रेसकडे विशेष निधी नाही, यंत्रणा नाही, कार्यकर्त्यांची कमी आहे. हे सगळ्यांनाच माहीत होतं, म्हणून फारसा फरक पडला नाही. उलट भाजपच्या प्रचारासाठी मोदी, शहा आले. सभांना प्रचंड गर्दीही झाली. ते आले आणि त्यांनी जिंकलं.. असा कार्यकर्त्यांचा समज झाला, पण निकाल लागला तेव्हाच हे कोडं सुटलं. विरियातोनेही पायीच घरोघरी जाणं पसंत केलं. तेही लोकांना भावलं. शेवटी जनतेची मर्जी, स्वातंत्र्य काळात काँग्रेस नेत्यांनी दिलेली झुंज अजून लोक विसरलेले नाहीत.. आणि याला मोदी काहीच करू शकत नाहीत. नेत्यांपेक्षाही जनता सूज्ञ आहे. फारसा गोंधळ, गाजावाजा न करता मूकपणे आपलं मत प्रदर्शित करणारी आहे. ख्रिश्चन समाज मायनॉरिटी आहे, केवळ मायनॉरिटी असलेल्या लोकांमुळे कुठलाही पक्ष जिंकू शकत नाही. त्यामुळे दक्षिणेत काँग्रेसला ख्रिस्ती समाजाबरोबरच हिंदू आणि मुसलमानांचीही साथ मिळाली, हे मान्य करावंच लागेल. म्हणून ख्रिस्ती समाजाला धर्माच्या बंधनात अडकवून त्यांची बौद्धिक कुवत न समजण्याचा मूर्खपणा भाजपने करू नये.

 

Web Title: political overview of congress defeated bjp in south goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.