सूरज नाईक पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोव्यातील अनुसूचित जमातींना गोवा विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळायला पाहिजे. अजूनपर्यंत ते शक्य झालेले नाही. ते का झालेले नाही असा सवाल करत धनगर समाजाचाही अनुसूचित जमातीत समाविष्ट करावा अशी मागणी राज्यातील दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी केली आहे.
आज गुरुवारी त्यांनी येथील दक्षिण गोवा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेउन वरील मागणीचे विधान केले.राज्यात मोठया प्रमाणात अपघात घडतात, याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला. राज्यातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. राजधानी पणजीतील सांतइनेज, सांताक्रुझ येथे जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी रस्त्यावर कुठेही खड्डे पडलेले असेल तर ते लक्षात आणून दयावे. रस्त्यावर एकही खड्डे असणार नसल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात स्थिती काय आहे ती बघावीत. गोव्यात मोठया संख्येने पर्यटकही येतात. राज्याचे नाक कशासाठी कापतात असा सवाल त्यांनी सरकारला उद्देशून केला.
१९६१ पुर्वी जन्मलेल्या गोमंतकीयांची पोतुर्गीजमध्ये जन्मनोंदणी आहे. केंद्र सरकारने या लोकांना दिलासा दयावा. आपण याबाबत गृहमंत्री तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडेही चर्चा करुन तशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. धर्मिका सलोखा कायम असायला हवा , धर्मावरुन फुट घालू नका. श्रीरामाने भाजपाला सदबुध्दी दयावी असेही ते म्हणाले.