लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सभापती रमेश तवडकर यांनी काल, रविवारी प्रियोळ मतदारसंघात राबविलेल्या श्रमधाम योजनेच्या भूमीपूजन समारंभामुळे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिक आमदार तथा मंत्री असूनही डावलण्यात आल्याने तसेच प्रतिस्पर्धी असलेल्या मगोचे माजी आमदार दीपक ढवळीकर यांच्याशी तवडकर यांच्या वाढलेल्या जवळीकीमुळे हे आपल्याविरोधात खुले राजकारण आहे. भाजपवर पक्षश्रेष्ठींचे नियंत्रण राहिलेले नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
'लोकमत'शी बोलताना मंत्री गावडे म्हणाले, 'प्रियोळ मतदारसंघात श्रमधाम योजना राबवण्यास माझा कधीच विरोध असणार नाही. गरीबांना जर घरे बांधून मिळत असतील तर त्यांचे स्वागतच असेल. पण प्रियोळमध्ये येऊन माझ्या विरोधात राजकारण करणार असाल, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असेल तर मला ते चालणार नाही. स्थानिक आमदार, मंत्री असताना मला बोलावले नाही हे मोठे राजकारण आहे. यावरुन पक्षश्रेष्ठींचे काहीच नियंत्रण राहिलेले नाही असे स्पष्ट होते.'
मंत्री गावडे म्हणाले की, 'माझ्या मतदारसंघात येऊन खुलेपणाने माझ्या विरोधात राजकारण करण्यात येत आहे. तरीही पक्ष यावर चुप्पी साधून आहे, हे पाहून खूप वाईट वाटते. यापूर्वीदेखील आप, काँग्रेस, दोन अपक्ष आणि भाजपमधील ठराविक एक गट अशा सहा घटकांनी एकत्र येऊन माझ्या पराभवाचा प्रयत्न केला. पण त्यांना मला पराभूत करणे शक्य झाले नाही. लोक माझ्यासोबत राहिले आणि यापुढेही राहतील' असेही गावडे यांनी यावेळी सांगितले.
पर्रीकर असते तर...
मंत्री गावडे म्हणाले की, 'प्रियोळमध्ये येण्यास रमेश तवडकर यांना मगोचे तीन वेळी पराभूत दीपक ढवळीकरांचे पाय धरावे लागले, हीच त्यांची मोठी शोकांतिका आहे. मुख्यमंत्रीदेखील बघ्याची भूमिका घेत आहेत, जर मुख्यमंत्रीपदी पर्रीकर असते, तर असे घडले नसते,' असेही गावडे यांनी सांगितले.
घर नसलेल्यांना घर
उभारून देणारी श्रमदान ही माझ्यासाठी केवळ योजना नसून चळवळ आहे. त्यासाठी केवळ एखादा मतदारसंघ किंवा तालुक्यापर्यंतच मी मर्यादित राहणार नाही. राज्यात मला चळवळ पोहोचवायची आहे. यात योगदान देणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे, मग ते दीपक ढवळीकरही का असेनात. - रमेश तवडकर, सभापती.