पणजी - काँग्रेसमधून भाजपमध्ये आमदारांची आयात केली गेली व आमदार आता भाजपामध्ये स्थिरावले असले तरी, भाजपाचे कार्यकर्ते व नव भाजपा आमदार यांच्यात अजून मनोमिलन होईनासे झाले आहे. काही मतदारसंघांमध्ये आमदारांचे कार्यकर्ते व भाजपाचे मूळ कार्यकर्ते यांच्यात संघर्ष होत आहे. त्यांच्यातील मनोमिलनात अडचणी येत आहेत.
फेब्रुवारी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. भाजपाचे त्यावेळी फक्त तेरा उमेदवार निवडून आले होते. भाजपाकडे आता आमदारांची संख्या सत्तावीस आहे. यापैकी विश्वजित राणे, पांडुरंग मडकईकर, माविन गुदिन्हो यांच्यासह सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, बाबू कवळेकर, नीळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेरात, बाबूश मोन्सेरात व उर्वरित सहा आमदार हे मूळ काँग्रेस नेते आहेत. कुंकळ्ळीचे क्लाफास डायस, नुवेचे विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, सांताक्रुझचे टोनी फर्नाडिस, सांतआंद्रेचे सिल्वेरा हे आमदारही कवळेकर यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपात आले. यापैकी काही आमदारांचे कार्यकर्ते व मूळ भाजपा कार्यकर्ते यांच्यात मनोमिलन घडवून आणण्याचे प्रयत्न भाजपाची कोअर टीम करत आहे.
भाजपाचे काही मूळ कार्यकर्ते खूप हताश झालेले आहेत. सत्तरी तालुक्यातही याचा अनुभव येतो आणि कुंकळ्ळी, सांतआंद्रे अशा काही मतदारसंघांतही हाच अनुभव येत आहे. बाबूशच्या भाजपामधील प्रवेशानंतर ताळगाव व पणजीत भाजपाचे मूळ कार्यकर्ते गारद झाले.
भाजपाचे पणजीतील काही मूळ कार्यकर्ते अधूनमधून मोन्सेरात यांची भेट घेतात व आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांच्यासोबत नव्हतोच, आम्ही आतून तुमच्याचसाठी काम केले, असेही सांगतात. सांतआंद्रे मतदारसंघात अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी अजून सिल्वेरा यांना आपला आमदार म्हणून स्वीकारलेले नाही. कुंकळ्ळी मतदारसंघातही तोच अनुभव येतो. भाजपाकडून सदस्य नोंदणी मोहीम राबवली जात आहे. सदस्य नोंदणी मोहीमेवेळी भाजपाचे मूळ कार्यकर्ते व काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले नेते यांच्यातील विसंवाद दिसून येऊ लागला आहे. नोकर भरती करतेवेळी नवे आयात केलेले मंत्री आपल्याला डावलतील अशी भीती भाजपाच्या काही मूळ कार्यकर्त्यांना वाटत आहे. या सर्व समस्यांवर उपाय काढण्याचा प्रयत्न भाजपाची कोअर टीम करत असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.