म्हापसा - गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच दिवंगत म्हापसा मतदारसंघाचे आमदार अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर मतदारसंघात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी तसेच भाजपाची उमेदवारी प्राप्त करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होण्यास प्रारंभ झाला आहे. इच्छुकांच्या यादीतील प्रत्येक उमेदवाराने आपले घोडे दामटायला सुरुवात केली आहे. रिक्त झालेल्या म्हापसा मतदारसंघाची पोटनिवडणूक राज्यातील इतर दोन निवडणुका समवेत लवकरच होणार आहे.
प्रदीर्घ आजारानंतर गेल्या आठवड्यात अॅड. फ्रान्सिस डिसोजा उर्फ बाबूश यांचे निधन झाले. सतत चार वेळा म्हापसा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या बाबूश यांच्या निधनानंतर म्हापसा मतदारसंघात त्यांची रिकामी झालेली जागा भरुन काढण्यासाठी तसेच भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच इच्छुक उमेदवार आता पुढे सरसावले आहे. यातील बहुतांश उमेदवार बाबूश यांच्यामुळे मागे पडले होते. यात बाबूश यांचा पूत्र तसेच म्हापसा पालिकेचे विद्यमान नगरसेवक जोशुआ डिसोझा यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक सुधीर कांदोळकर, संदीप फळारी, प्रदीप जोशी, मुख्यमंत्र्यांचे निजी सचिव रुपेश कामत यांचा सुद्धा त्यात समावेश आहे.
बाबूश यांच्या अंत्यविधीवेळी झालेल्या शोकसभेत बोलताना त्यांचे पूत्र जोशुआ यांनी आपण इच्छुक असल्याचे संकेत दिले होते. आपल्या वडिलांनी सुरू केलेले कार्य आपण पुढे नेणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले होते. गोवा फॉरर्वर्डचे अध्यक्ष मंत्री विजय सरदेसाई यांनी बाबूश यांच्या निवासस्थानी दिलेल्या सांत्वरपर भेटी दरम्यान जोशुआ यांना आपला पाठींबा व्यक्त करुन आपले पिताचे कार्य पुत्राने पुढे न्यावे अशीही सुचना केली होती. उपसभापती मायकल लोबो यांनी सुद्धा जोशुआ यांना आपला पाठिंबा व्यक्त केला होता.
म्हापसा पालिकेचे जेष्ठ नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर व संदीप फळारी यांना मागील अनेक वर्षापासून इच्छूक असून सुद्धा पर्याय नसल्याने बाबूश यांचे समर्थन करुन त्यांना पाठिंबा दिला होता; पण त्यांच्या निधनानंतर दोघानांही आता निवडणूक लढवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असून तेही इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. यावेळी दोगांनाही संधी लाभली नाही तर पुन्हा संधी लाभण्याची शक्यता धूसर असल्याचे त्यांना वाटत असल्याने या रेसमध्ये हे दोघेही आघाडीवर असल्याचे दिसून आले.
राजकीय क्षेत्राशी कधीच संबंध नसलेले पण लोकसंपर्क दांडगा असलेले विमा एजंन्ट प्रदीप जोशी हे सुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत. २०१७ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी बाबूश यांना बाजूला सारून त्यांच्या जागी जोशी यांना उमेदवारी देण्यावर चर्चा सुरू झाली होती. तसा प्रयत्नही पक्ष पातळीवर सुरू झाला होता; पण बाबूश यांनी पक्षाला दिलेल्या योगदानामुळे व उमेदवारी बाबूशलाच देण्यात यावी यावरुन दबाव वाढल्यानंतर शेवटी बाबूश यांनाच उमेदवारी देण्यात आलेली. सध्या ते हयात नसल्याने जोशी सुद्धा अपेक्षितांच्या यादीत दाखल होवून सक्रिय झाले आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निजी सचिव म्हापशातील रहिवाशी रुपेश कामत यांनी सुद्धा स्वत:ला उमेदवारी लाभावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मागदर्शनाखाली घेण्यात आलेल्या म्हापसा पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला दोन तृतीयांश बहुमत लाभले होते. लाभलेल्या या भरघोस यशानंतर त्यांचा दावा मजबूत झाला होता. नगरसेवक तुषार टोपले यांचेही नाव समोर येवू लागले आहे.
शनिवारी बाबूश यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत दाव्या प्रती दाव्यांना बराच जोर चढला होता. वेगवेगळ्या बैठकांचे सत्र सुरू झाले असून प्रत्येकाने आपल्या नावावर शिक्कामोर्तब व्हावा यासाठी प्रयत्न सुद्धा सुरु केले आहेत. पक्षाचे महामंत्री सतीश धोंड यांनी सोमवारी रात्री म्हापशात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेवून मते आजमवण्यास कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यास उमेदवाराची चाचपणी करण्यास प्रारंभ केला आहे.