पणजी: सहकार क्षेत्रात राजकारण व स्वाहाकार आणू नये. तसे झाले तरच सहकार क्षेत्र समृद्ध बनेल व त्याची प्रगती होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा राज्य सहकार सप्ताह समारोप निमित पणजीतील सहकार संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट कोऑपरेटर म्हणून मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष सखा नंदा मळीक, उत्कृष्ट अध्यक्ष श्रीपाद सोनू परब, उत्कृष्ट सचिव अशोक गावडे, उत्कृष्ट संस्था, डेअरी सोसायटी तसेच सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यात सहकार क्षेत्राची हवी तशी प्रगती झालेली नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. सहकार क्षेत्रात कधीही राजकारण व स्वाहार आणू नये , असे आपले ठाम मत आहे. तसेच झाले तरच हे क्षेत्र समृध्द बनेल व प्रगती साधेल. अन्यथा त्या कधीही समृद्ध होणार नाहीत. राजकारण व स्वाहाकार आणल्यानेच अनेक सहकारी संस्था संपल्या आहेत, हे सत्य आहेत. सहकार संस्थांच्या माध्यमातून लोकांचा विकास साधायचा असतो. मात्र काही संस्थांच्या संचालक, अध्यक्षांनी वाट लावली. त्यामुळे सहकार संस्थांमध्ये राजकारण आणू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.