पणजी : राज्यातील चौदापैकी अकरा नगरपालिका आणि पणजी महापालिका क्षेत्रात आज सकाळपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. येत्या २० मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल व २२ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. दि. २५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.
राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी ओएसडी आशूतोष आपटे, सहाय्यक संचालक सागर गुरव व इतरांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. वाळपई, पेडणे, म्हापसा, डिचोली, मडगाव, कुंकळ्ळी, सांगे, केपे, काणकोण, कुडचडे काकोडा आणि वास्को अशा अकरा नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. या अकरा ठिकाणी एकूण २ लाख ५० हजार ४७० मतदार आहेत. पणजी महापालिका क्षेत्रात ३२ हजार ४१ मतदार आहेत.
साखळी पालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊसाठीही पोटनिवडणूक २० मार्चलाच होणार आहे. तसेच सासष्टीतील नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघातही २० रोजीच मतदान प्रक्रिया पार पडेल. आचारसंहिता ही पूर्ण राज्यात नसेल, जिथे निवडणूक होत आहे, तिथेच आचारसंहिता लागू झालेली आहे, असे आयुक्त गर्ग यांनी स्पष्ट केले. २१ निवडणूक अधिकारी व २२ सहाय्यक निवडणूक अधिकारी आयोगाने नियुक्त केले आहेत. शिवाय २४ खर्च विषयक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. ते उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतील.
कोविडग्रस्तांसाठी एक तास राज्यात सध्या कोविडचे रुग्ण पाचशेहूनही कमी आहेत. त्यांना मतदान करण्याचा हक्क बजाविता यावा म्हणून सायंकाळी चार ते पाच हा शेवटचा तास राखून ठेवला गेला आहे. या एक तासात ते मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकतील, असे गर्ग यांनी सांगितले. निवडणुकीवेळी सर्व उमेदवारांसह मतदार व अन्य सर्वांनीच कोविडविषयक प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन गर्ग यांनी केले. न्यायालयात आरक्षणाविरुद्ध याचिका असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, न्यायालय काय तो निर्णय घेईल, आपण त्यावर बोलू शकत नाही असे गर्ग म्हणाले.
निवडणुकीचा कार्यक्रम-२५ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारणार- अर्ज स्वीकारण्यास अंतिम मुदत ४ मार्च (रविवार वगळून)- अर्जांची छाननी ५ मार्च रोजी- अर्ज मागे घेण्यास मुदत ६ मार्च रोजी- मतदान २० रोजी- मतमोजणी व निकाल २२ मार्च रोजी- पणजी महापालिका क्षेत्रात ३२ हजार ४१ मतदार- अकरा पालिका क्षेत्रांत २ लाख ५० हजार ४७० मतदार