पणजी - राज्याच्या विविध भागांमध्ये खनिज खाणींना जल व हवा कायद्याखाली कनसेन्ट टू ऑपरेटचे दाखले देण्याचे काम गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरूच ठेवले आहे. गेल्या आठवडय़ात 21 खनिज खाणींना कनसेन्ट टू ऑपरेटचे दाखले दिल्यानंतर आता आणखी 12 खनिज खाणींना कनसेन्ट टू ऑपरेट देण्यासाठी मंडळाचे चेअरमन गणोश शेटगावकर यांनी फाईल्स निकालात काढल्या आहेत.
बारा खनिज खाणींना कनसेन्ट टू ऑपरेट दिले जातील पण वाहतुकीच्या प्रमाणाविषयी आम्ही काही अटी लागू केल्या आहेत, असे बुधवारी चेअरमन शेटगावकर यांनी येथे लोकमतला सांगितले. ह्या बारा खनिज खाणी केवळ सोनशीमधीलच नव्हे तर कुडणो व अन्य भागांतीलही आहेत. ज्या खनिज खाणी अजून सुरू झालेल्या नाहीत, त्यांनाही आम्ही जल व हवा कायद्याखाली कनसेन्ट टू ऑपरेट देत आहोत. दाखले दिल्यानंतरच ह्या खाणी सुरू होऊ शकतील.
दरम्यान, मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी करणा:या एसडब्ल्यूपीएल कंपनीचा कनसेन्ट टू ऑपरेट दाखला मंडळाने यापूर्वीच रद्द केला आहे. या कंपनीला दाखला हवा असल्यास नव्याने मंडळासमोर अर्ज करावा लागेल. कंपनी न्यायालयात गेली होती. कंपनीला व मंडळालाही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. कंपनीची जी नऊ जहाजे सध्या समुद्रात आहेत व अध्र्या वाटेवर आहेत, त्यांना मुरगाव बंदरात कोळसा उतरण्यास मान्यता दिली जाईल. मात्र त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांची देखरेख असेल. देखरेखीखालीच हे काम होईल, असे शेटगावकर यांनी स्पष्ट केले. मुरगाव बंदराने या कंपनीला कनसेन्ट टू ऑपरेट दाखला दिला जावा, अशी मागणी मंडळाकडे केली आहे. तथापि, अर्ज आल्यानंतर कोणता निर्णय घ्यावा ते मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडून ठरविले जाणार आहे, असे चेअरमन शेटगावकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयात हस्तक्षेप करून या कंपनीला कनसेन्ट टू ऑपरेट दाखला मिळवून द्यावा, अशी मागणी आता एमपीटीचे कर्मचारी व निवृत्त अधिकारी संघटनेने सरकारकडे केली आहे, असे सुत्रंनी सांगितले.