लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील खिस्ती बांधवांचा भाजपला नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे. ईशान्येतील ख्रिस्तीबहुल राज्येही भाजपसोबत आहेत, असा दावा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोपना मी गोव्यात येण्याचे निमंत्रण दिले असून, पुढील वर्षी त्यांची गोवा भेट शक्य असल्याचे सांगितले.
गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलीप नेरी फेर्राव यांनी गोवेकरांना धर्मनिरपेक्ष उमेदवारालाच मतदान करण्याचे केलेले आवाहन व त्याअनुषंगाने येत्या दि. ३ व ५ मे रोजी चर्चमध्ये आयोजित केलेल्या विशेष प्रार्थनांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे विधान केले आहे.
मोदी म्हणाले की, ख्रिस्ती समुदाय भाजपसोबत नाही, हे मला मान्य नाही. व्हॅटिकन येथे पोपना भेटून भाजप सरकारने अल्पसंख्याकांसाठी केलेल्या कामांची माहिती मी त्यांना दिलेली आहे.
काय म्हणाले होते कार्डिनल....
गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव यांनी लोकांना आवाहन करताना 'जे खरोखरच सर्व लोकांच्या भल्यासाठी आणि आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांचे पालन करण्यास वचनबद्ध आहेत अशा धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मते द्या, असे आवाहन केले होते. ६ मे रोजी मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली वालंकनीला जाण्याचा बेतही रद्द करावा व मतदानाचा हक्क बजावावा, असेही कार्डिनलनी म्हटले होते.
...तरच मोदींना धर्म आठवतो : पाटकर
काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मोदींना निवडणुका जवळ आल्या की धर्म आठवतो, अशी टीका केली आहे. कार्डिनलनी गोव्याची अस्मिता सांभाळणाऱ्या, गोवा वाचवू शकणाऱ्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. गोमंतकीय जनता त्यानुसार निर्णय घेईलच, असेही ते म्हणाले.