लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्वरी येथे बांधण्यात येत असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, गुरुवारी बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलिस तसेच इतर संबंधित अधिकाग्रांची बैठक घेतली. यावेळी स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेही उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खंवटे म्हणाले की, या उड्डाणपुलाचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये होणार असून दोन वर्षात ते पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणच्या टोकाकडील भागाचे काम केले जाईल व दुसऱ्या टप्प्यात पुलाच्या मधल्या भागाचे काम करण्यात येईल. कंत्राटदाराने ज्या प्रकारे प्रारंभीच कामाला गती दिली आहे त्यानुसार दोन वर्षात ते पूर्ण होईल, असा विश्वास मला आहे.
पर्वरी येथे साडेपाच कि.मी.च्या सहापदरी उड्डाण पुलाचे ३६४.६८ कोटी रुपये खर्चाचे काम राजेंद्र सिंह भांबू इन्फ्रा कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर पणजी म्हापसा मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या पुलाचे काम करावे लागणार असल्याने पर्वरीतील वाहतूक काही ठिकाणी सव्र्व्हिस रोडने वळवावी लागेल. तसेच अन्य व्यवस्थाही करावी लागेल, त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. उड्डाणपूल व जोड रस्त्याचे रुंदीकरण यासाठी एकूण ६०० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. उड्डाणपुल पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. पुलाच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे.