लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : 'जशी आम्हाला कोकणी हवी आहे तशी मराठीपण हवी आहे. साहित्यिक दामोदर मावजो जे काही बोलले, त्यावरून मीसुद्धा आश्चर्यचकित झालो आहे. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. तेव्हा त्यांनी अशा गोष्टीपासून लांब राहायला हवे' असे मत मगोचे नेते तथा वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.
सध्याची स्थिती लक्षात घेता साहित्य कसे पुढे जाईल, हा एकच विचार आम्ही लक्षात घ्यायला हवा. भाषावादावर भाष्य करायची ही वेळ नाही. भाषेचे राजकारण करून आम्हाला कदापी पुढे जायचे नाही असेही त्यांनी सांगितले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी अलीकडेच मराठी राजभाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत ते बोलत होते.
यावेळी मंत्री ढवळीकर म्हणाले की, "हा विषय सध्यातरी आपण त्यांच्यापुरताच मर्यादित ठेवण्याची गरज आहे. आता या विषयावरून अनाठायी काही गोष्टी होता कामा नये. कोकणी व मराठी या विषयावर बोलण्यापेक्षा त्यांनी आजघडीला कोकणी साहित्य पुढे नेण्यासाठी सरकारला सूचना द्यायला हव्यात, जेणेकरून कोकणी साहित्य आणखी पुढे जाऊ शकेल.
मंत्री ढवळीकर म्हणाले की, 'अगोदरच १९८४ च्या भाषा आंदोलनात आमचे खूप नुकसान झाले आहे. समाजाचेसुद्धा नुकसान झाले आहे. त्यावेळी आंदोलनात लोक मृत्युमुखीसुद्धा पडले होते. भाषेच्या मुद्द्यावरून ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये असे मला वाटते. साहित्य कसे वाढवावे हे त्यांनी आम्हाला सांगावे. त्यांना आमचा नेहमी पाठिंबा असेल.'
... त्यांचे शिक्षणसुद्धा
मंत्री ढवळीकर म्हणाले की, मराठी ही खूप मोठी भाषा आहे. त्या भाषेला सरकारच्या माध्यमातून व्यासपीठ हवे आहे असे नाही. आज मराठी भाषेचे स्थान अढळ असेच आहे. खुद्द दामोदर मावजो यांचे प्राथमिक शिक्षणसुद्धा कदाचित मराठीतूनच झाले असावे. त्याकरिताच मराठीवर बोलताना त्यांनी खूप विचार करूनच बोलायला हवे होते.