म्हापसा - एकेकाळी राज्यातील राजकारणात आपले प्रभुत्त्व गाजवणारे अनेक सरकारात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारी आहेत. पक्षाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी त्यांच्या पुर्नप्रवेशाची हालचाल सध्या सुरू झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पक्षातील त्यांचा पुर्नप्रवेश काँग्रेससाठी बराच लाभदायी ठरण्याची शक्यता आहे.
सुमारे चार दशके राज्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेले विविध सरकारात विविध प्रकारची खाती सांभाळणारे माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करावा म्हणून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. बार्देस तालुक्यातील बऱ्याच मतदारसंघात आजही प्रभाव असलेल्या नार्वेकरांनी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास त्याचा बराच फायदा काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता आहे. हळदोणा, थिवी, म्हापसा तसेच पर्वरी मतदारसंघात आजही त्यांचा प्रभाव कायम असल्याने या मतदारसंघात पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी काँग्रेसला नार्वेकरांचा बराच फायदा होवू शकतो.
२०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत हळदोणा मतदारसंघातून विद्यमान भाजपाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी नार्वेकरांचा पराभव केला होता. झालेल्या पराभवानंतर सुमारे दोन वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिले होते. दोन वर्षाचा अज्ञातवास संपवून नार्वेकरांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या सुमारे १ महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाचा त्याग करुन स्वत:चा गोवा डॅमोक्रेटीक फ्रंट हा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
याच पक्षातून २०१४ सालची लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी उत्तर गोवा मतदार संघातून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अपेक्षेनुसार मते न मिळाल्याने एकूण सात उमेदवारांच्या यादीत नार्वेकरांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून पून्हा दूर झाले होते. नार्वेकरांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपासून पहिल्यांचा दूर राहिले होते. सदरची निवडणूक न लढवता स्वत:ला अलिप्त ठेवण्याचा निर्णय नार्वेकरांनी घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यापासून नार्वेकरांनी पुन्हा काँग्रेस पक्षात सामील होवून पक्षाला मार्गदर्शन करावे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पुन्हा काँग्रेस प्रवेश करावा यासाठी काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी तीन वेळा नार्वेकरांची त्यांच्या निवासस्थानी येवून भेट सुद्धा घेतली होती. दोन दिवसापूर्वी त्यांच्या वाढदिवसाला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. त्यात पक्षाच्या इतर आमदारा बरोबर विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांचा सुद्धा समावेश होता. त्यांचे हे प्रयत्न कितपत यशस्वी होवू शकतात हे पुढील काळातच ठरणार आहे.
काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे नार्वेकरांनी मान्य केले; पण त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली. पक्षाने ठेवलेल्या प्रस्तावार विचार सुरु असल्याचे ते म्हणाले. आपला पुर्न प्रवेशाने पक्षाला कितपत फायदा होवू शकतो पक्षातील इतर नेत्यांची भूमिका कोणती असेल यावरही आपला प्रवेश अवलंबून असल्याची माहिती त्यांनी दिली. १९८० च्या दशकापासून आपण प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे कार्य केले असून सध्या आपण सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, जे लोक भाजपा विरोधी आहेत व भाजपाचा पराभव करू इच्छीतात त्या सर्वांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जाणार आहे; पण दयानंद नार्वेकर यांना पक्षात प्रवेश दिला जाणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.