पणजी - एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कारावेळी निर्वस्त्र न करण्याबाबत गोव्यात आता प्रथमच जागृती वाढू लागली आहे. विविध गावांतील पंचायती, संघटनांकडून या प्रथेविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. साळगाव मुक्तीधाम समितीच्याही नुकत्याच झालेल्या बैठकीत यापुढे कुणाचंही निधन झाल्यावर अंत्यसंस्कारावेळी मयताच्या शरीरावरील सगळे कपडे काढायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.
रमेश घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला समिती सदस्यांव्यतिरिक्त गावातील काही प्रतिष्ठीत नागरिकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शिरगाव ग्रामपंचायतीच्याही नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एक निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे गावात कुठल्याही महिलेचं निधन झाल्यानंतर तिच्या शरीरावरील कपड्यांसह मृतदेहाचं दहन करण्यात येईल, अशा प्रकारचा निर्णय ग्रामसभेत झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावरून या निर्णयाचे स्वागत केलं आहे.
यामुळे गोव्यातील मानवी हक्क आयोगानेही अंत्यसंस्कारावेळी महिलांच्या शरीरावरील कपडे काढले जाऊ नयेत, अशा अर्थाची सूचना केलेली आहे. विविध ग्रामसभांमध्ये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या व्यासपीठावरून आता गोव्यात याविषयी चर्चा होऊ लागली आहे व निर्णयही घेतले जाऊ लागले आहेत. मयतांचे सगळे कपडे अंत्यसंस्कारावेळी काढण्याची प्रथा गोव्यात नजिकच्या काळात पूर्णपणो थांबेल, असे संकेत या घटनांमधून मिळू लागले आहेत.
दरम्यान, साळगाव येथे झालेल्या मुक्तीधाम समितीच बैठकीत इतरही काही निर्णय घेण्यात आले. स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुशोभित करण्याचे ठरले. सध्याचे प्रवेशद्वार मोडून नवे बांधले जाईल, अशी माहिती सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी दिली. पूर्ण गावासाठी एकच स्मशानभूमी असून तिचा विस्तार केला जावा याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नामदेव हुम्रसकर, प्रमोद परुळेकर, वासूदेव शिरोडकर, तानाजी वेळगेकर, अजरुन हरमलकर यांनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. काहीजणांनी विविध कामांचा खर्च करण्यास मदतीचे आश्वासन दिले. खजिनदार मनोज बोरकर यांनी खर्चाचा तपशील सांगितला. हल्लीच मरण पावलेले समितीचे सदस्य नागेश नाईक, तसेच स्मशानभूमीप्रश्नी वर्षाआधी झालेल्या वादात मदत केलेले तातू मांद्रेकर व इतरांना बैठकीवेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.