पणजी : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक व त्यांचे सहकारी तथा या सेनेच्या अन्य सदस्यांना गोव्यात आणखी चार महिन्यांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. येत्या दि. १४ जानेवारी २०१६ पर्यंत ही बंदी लागू असेल, असे सरकारच्या गृह खात्याने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. पोलीस खाते व दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त केल्यानंतर सरकारने बंदी कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मुतालिक यांना सहा महिन्यांसाठी गोव्यात प्रवेश बंदी लागू करण्यात आली होती. नंतर दर सहा महिन्यांनी बंदीचा कालावधी वाढविण्यात आला. आता आणखी चार महिने बंदी लागू झाली आहे. बंदी आदेशाविरुद्ध यापूर्वी मुतालिक हे सर्वोच्च न्यायालयातही गेले होते; पण त्यांना दिलासा मिळाला नाही. श्रीराम सेनेमुळे गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा तसेच गोव्याच्या धार्मिक सलोख्यास बाधा पोहोचण्याचा धोका सरकारला वाटत असल्याने बंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे गृह खात्याचे म्हणणे आहे. आपण गोव्यात श्रीराम सेनेची शाखा सुरू करणारच, अशा प्रकारचे इशारे यापूर्वी मुतालिक यांनी दिलेले आहेत. गोवा हे सुशिक्षित राज्य असून पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या या राज्यात ‘मोरल पोलिसिंग’ची गरज नाही, असे येथील विविध घटकांना वाटते. (खास प्रतिनिधी)
प्रमोद मुतालिकांना गोव्यात प्रवेश बंदच
By admin | Published: September 22, 2015 12:46 AM