पणजी: देशातील पाच राज्यांसह गोवा विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Election Result 2022) अलीकडेच हाती आले. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता राखली. मात्र, या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले होते, ते पणजीतील अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांच्या लढतीकडे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र असलेले उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करत भाजपच्या उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकले. मात्र, उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर मात्र आता उत्पल आणि भाजपमधील दुरावा मिटला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांची १७ मार्च ही पुण्यतिथी. मनोहर पर्रिकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उत्पल पर्रिकर यांच्यासोबत गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंत शेठ तानावडे, आमदार बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हलर्णकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी पणजीतील समाधीस्थळी जाऊन मनोहर पर्रिकरांना आदरांजली वाहिली. यामुळे उत्पल आणि भाजपच्या मनोमिलनाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उत्पल पर्रिकर पुन्हा भाजपात जाणार?
भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उत्पल पर्रिकर यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार बाबुश मोन्सेरात यांना कडवी टक्कर दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. यानंतर उत्पल पर्रिकर यांनी प्रतिक्रिया देताना, पुन्हा भाजपमध्ये जाणार का? या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले. पणजीमध्ये माझ्या विचारांनी जी मते मिळवण्यात मी यशस्वी झालो. तीच मते माझ्यासोबत आहेत. केवळ चिन्हाचा विचार केला तर तुम्ही मी कुठे असतो हा विचार करा. पणजीत सगळ्यांनी जेवढा पाठिंबा दिला. जवळपास जिंकणाऱ्या उमेदवाराएवढाच पाठिंबा मिळाला. पणजीचे विषय विधानसभेतच मांडायचे असतात, असे कुणी सांगितलेय, बाहेरही ते मांडू शकतो, असे उत्पल पर्रिकर म्हणाले. तसेच पुन्हा पक्षात जाणे हा तांत्रिक मुद्दा आहे, असे सांगत माझ्यासाठी आमदार व्हायचे हा मुद्दा कधीच नव्हता. तसेच देवेंद्र फडणवीसांकडून जो पर्याय दिला गेला होता. तिथे भाजप जिंकला नाही, असा टोलाही उत्पल यांनी लगावला.
बाबूश मोन्सेरात स्वपक्षावरच नाराज
बाबुश मॉन्सेरात यांचा पणजीमध्ये निसटता विजय झाला. अपक्ष उमेदवार असूनही उत्पल यांनी मॉन्सेरात यांना कडवी लढत दिली. मॉन्सेरात यांनी विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांबद्दल नाराजी बोलून दाखवली. आपल्याला मिळालेले मताधिक्य समाधानकारक नाही. अनेक भाजप कार्यकार्त्यांनी आपल्याला मतदान न केल्याचा दावा मोन्सेरात यांनी केला. ही बाब भाजप नेत्यांच्या कानावर घातली आहे. त्यांनी भविष्यात ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. राज्य भाजपने लोकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवला नाही. भाजपच्या सर्व नेत्यांच्या संपर्कात आहे आणि मी भाजपसोबत आहे, असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, गोवा भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. विश्वजित राणे यांनी प्रमोद सावंत यांना आपला नेता मानण्यास नकार दिल्याने भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक निकाल लागून अनेक दिवस झाले, तरी भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याची चर्चाही आहे. या एकूण पार्श्वभूमीवर प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत याचेच नाव निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.