पणजी - भाजप विधिमंडळ नेता निवडीसाठी आलेल्या केंद्रीय निरीक्षकांनी पक्षाच्या आमदारांची स्वतंत्र चर्चा करुन प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली. सावंत हे दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप आज सायंकाळीच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार असून आज किंवा उद्या शपथविधी अपेक्षित आहे. भाजपचे स्वत:चे २0, मगोपचे २ आणि अपक्ष ३ असे एकूण २५ एवढे संख्याबळ पक्षाकडे आहे. सर्व २५ आमदार राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
विधिमंडळ नेता निवडण्यासाठी आमदारांची दुपारी ४ वाजता एकत्र बैठक घेतली जाणार होती. परंतु निरीक्षकांनी दुपारी ४.३0 वाजता भाजपच्या येथील प्रदेश कार्यालयात एकेका आमदाराला बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. केंद्रीय संसदीय मंडळाने नेमलेले निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर, सहनिरीक्षक एल. मुरुगन, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार सावंत यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाले होते. निरीक्षक श्रेष्ठींकडून तसा संदेश घेऊन आले आणि विधिमंडळ आमदारांकडे वन टू वन चर्चेचे केवळ सोपस्कार पार पाडत सावंत यांच्या नावाची घोषणा केली. बैठकीनंतर भाजपचे सर्व आमदार तसेच नेते सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनवर जाणार आहेत. राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.
सुहासीनींकडून ओवाळणी -शहरातील आत्माराम बोरकर मार्गावर असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी बैठकीसाठी पक्षाच्या आमदारांचे एकेक करुन आगमन झाले त्यावेळी सुहासिनींनी ओवाळणी करुन आमदारांचे स्वागत केले. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तेथे असलेल्या घुमटीजवळ जाऊन प्रार्थना करुन आशीर्वाद घेतले.
सावंत हे मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मार्च २0१९ साली मुख्यमंत्री बनले होते. तीन वर्षे त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगले आता विधिमंडळ गटाने पुन्हा त्यांची नेतेपदी निवड केली आहे.
शपथविधी दोन टप्प्यांत?मंत्रिमंडळाचा शपथविधी दोन टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचा शपथविधी होईल. यात प्रमोद सावंत, विश्वजित राणे यांच्याबरोबरच सुदिन ढवळीकर तसेच दोन अपक्ष रेजिनाल्द लॉरेन्स व डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. उर्वरित सहा मंत्र्यांचा शपथविधी दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.