पणजी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे हे आमदारकीचा राजीनामा देतील व त्यांना केंद्र सरकार हरियाणामध्ये राज्यपाल म्हणून पाठवील, अशा प्रकारची अफवा रविवार व सोमवारी काँग्रेसजनांचे मोठे मनोरंजन करून गेली. मात्र ही अफवा भाजपमधूनच पसरविली गेली अशा प्रकारचा संशय आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या काही कार्यकर्त्यांना वाटत आहे. काँग्रेसमधील एका गटाला देखील तसेच वाटू लागले आहे.
प्रतापसिंग राणे हे गोव्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. ते काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही. ते राज्यपालपद स्वीकारण्याचाही प्रश्न येत नाही. तथापि, राणे हरियाणाला राज्यपाल म्हणून जातील अशी अफवा रविवारी (15 सप्टेंबर) पसरली. राणे यांनी स्वत: त्याविषयीचे वृत्त नाकारले आहे. ते खोडसाळ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र या अफवा भाजपमधीलच एका गटाकडून पसरविल्या जात असाव्यात असे अनेकांना वाटते. राणे यांचे पुत्र विश्वजित राणे हे भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. विश्वजित यांच्याविरोधात भाजपमधील एक गट कार्यरत आहे. आरोग्य खात्यातील मोठय़ा नोकर भरतीला अनपेक्षित धक्का देण्याचे काम याच गटाने केले आहे. विश्वजित राणे यांचे सरकारमधील महत्त्व कमी करण्यासाठी भाजपमधील एक गट छुप्या पद्धतीने वावरतोय व त्याच गटाने प्रतापसिंग राणे यांच्याविषयी अफवा पसरविली असेल अशा प्रकारची चर्चा विश्वजित यांच्या समर्थकांमध्ये सध्या सुरू झाली आहे. विश्वजित यांना याविषयी विचारले असता, मला काहीच बोलायचे नाही एवढेच ते म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रतापसिंग राणे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
मला गोवा सोडून जाण्याची काहीच इच्छा नाही. मी माझ्या व्यवसायात, शेतीमध्ये व लोकांमध्ये रमलेलो आहे. राज्यपालपदाचा प्रस्तावही मला कुणी दिलेला नाही. मी गोवा सोडून जाणार नाही. उगाच कुणी तरी याबाबत अफवा पसरवली आहे. राज्यपालपद हे फक्त सह्या करणे, उद्घाटने करणे एवढय़ापुरते मर्यादित असते. मला ते नको आहे. मला आता विधानसभेत पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत.
- प्रतापसिंग राणे, माजी मुख्यमंत्री