लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: प्रतिमा कुतिन्हो यांनी बुधवारी आम आदमी पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. वैयक्तिक तसेच व्यवसायाचे कारण कुतिन्हो यांनी या राजीनामा पत्रात दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा राजीनामा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रतिमा या आता कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याबाबतही कुतूहल निर्माण झाले आहे. कुतिन्हो यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या तरी आपला अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार नसल्याचे सांगितले. आपण आपल्या व्यवसायावर यापुढे लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घाईघाईने घेतला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपने आपल्यावर पक्षाच्या गोवा राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्याबद्दल आपण या पक्षाचे आभारी आहोत, असेही त्यांनी सांगितले.
प्रतिमा कुतिन्हो यापूर्वी काँग्रेस पक्षात होत्या. नावेली जिल्हा पंचायतीत त्यांना पराभव पत्कारावा लागल्यानतंर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून आपमध्ये प्रवेश केला होता. राजिनाम्याची प्रत त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल, गोवा राज्य निमंत्रक अॅड. अमित पालेकर यांना पाठवून दिली आहे.
बंधनात राहून काम करणे मला पसंत नाही...
'आप'ने मंगळवारी पक्षाची नवीन राज्य कार्यकारिणी घोषित केल्यानंतर दुसया दिवशीच कुतिन्हो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दहा महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीने गोव्याची सर्व राज्य कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यावेळी कुतिन्हो यांचेही पद काढून घेतले होते. राजीनामा देण्याचा निर्णय हा वैयक्तिक आहे. तो स्वतःच्या उत्कर्षासाठी घेतला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून मी वैयक्तिक पातळीवर विविध विषयांना वाचा फोडली. मी मोकळ्या स्वभावाची कार्यकर्ता आहे. कुठल्याही बंधनात राहून काम करणे मला पसंत नाही, यासाठीच मी राजीनामा दिल्याचेही प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.