लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: एक जूनच्या पहाटे राज्यात बरसलेल्या मान्सूनपूर्व सरींमुळे दक्षिण गोव्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात १ टक्का वाढ झाल्याची माहिती जलस्रोत खात्याकडून देण्यात आली. मान्सूनपूर्व सरी बरसल्या नसत्या तर पंचवाडी धरण आतापर्यंत आटूनही गेले असते असे सूत्रांचे म्हणणे आहे.
अद्याप भारतीय उपखंडात मान्सून अजून दाखल झाला नसला तरी त्याचा प्रभाव मात्र एक जून रोजी गोव्यात दिसून आला. विशेषत: दक्षिण गोव्यात जोरदार पाऊस पडला होता. सासष्टी, मुरगाव आणि काणकोणमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या पावसाने सर्वात महत्त्वाचे काम केले ते म्हणजे कोरड्या पडू लागलेल्या दक्षिण गोव्यातील धरणांना काही प्रमाणात दिलासा दिला.
पंचवाडी धरणात पाण्याची पातळी १४.७० मीटरपर्यंत खाली गेल्यास धरणातील पाणी संपले असे म्हटले जाते. कारण त्यानंतर या धरणातून आणखी पाणी खेचले जाऊ शकत नाही. १ जूनपूर्वी पंचवाडी धरणात पाण्याची पातळी ही १४.९० मीटर इतकी खाली गेली होती. म्हणजेच जवळजवळ डेड एंडला पोहोचले होते. १ जून रोजी मान्सूनपूर्व सरींनंतर या धरणातील पाण्याची पातळी वाढून १५.२८ मीटर इतकी झाली.
१ जूनपूर्वी या धरणात १ टक्क्याहून कमी पाणी शिल्लक होते. १ जूनच्या पावसानंतर २ टक्क्याहून अधिक पाणी झाले. पंचवाडी धरणात मान्सूनपूर्व सरींमुळे पाण्याची पातळी ३० सेंटिमीटर इतकी वाढली.
साळावलीतही वाढला साठा
केवळ पंचवाडीच नव्हे तर दक्षिण गोव्यातील सर्वच धरणांना मान्सूपूर्व सरींनी दिलासा दिला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या साळावली धरणात शिल्लक पाणीसाठा हा २२ टक्क्यांहून कमी झाला होता. १ जून रोजी तो २३ टक्क्यांवर गेला. चापोली आणि गावणे पाणी प्रकल्पातील पाणीसाठ्यातही मान्सूनपूर्व सरींनी वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.