लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रेनिमित्त राज्यात हजारो धोंड व्रत करतात. त्यामुळे नवीन सामान खरेदीसाठी तसेच फळे, भाजीपाला, कपडे व इतर खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे. यानिमित्ताने पाच दिवसात लाखोंची उलाढाल होत असते.
शिरगावात ग्रामस्थ तयारीत मग्न असून, रंगरंगोटी, सजावट, कमानी उभारणे, विद्युत रोषणाईची कामे सुरू आहेत. या ठिकाणी भुयारी वीज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. तसेच खोदलेल्या रस्त्यांचे हॉट मिक्स डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
होमकुंड रचण्याचे काम सुरू झाले आहे. हजारो धोंड विविध भागात व्रत करून देवीची सेवा करतात. परदेशातही राज्यातील धोंड कामानिमित्त आहेत ते ही त्या ठिकाणी व्रत करतात, असे महेंद्र किनळकर यांनी सांगितले. पाच व तीन दिवस स्वतंत्र व सोवळ्यात राहून दिवसाकाठी किमान दहावेळा स्नान करून फराळ करणे तसेच समूहाने राहून देवीची सेवा करणे हा अनुभव विलक्षण असल्याचे नार्वे येथील धोंड नवनाथ नाईक यांनी सांगितले.
प्रशासनाने उत्सवासाठी सर्व ती तयारी सुरू केली असून, देवस्थान समिती ही अनेक बाबतीत कार्यरत आहे. लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व पार्किंग सुविधा, भाविकांना शिस्तीत दर्शन घेण्यासाठीची यंत्रणा, प्रसाधन व्यवस्था आदी व्यवस्था केली जात असून, भाविकांनी सर्व ते सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष गणेश गावकर यांनी केले आहे.
येथील प्राथमिक शाळेच्या मुलांनी कागदी पिशव्या तयार करत जत्रेत वितरित करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याचे काम सुरू केले आहे. तळीचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या व्रतात लहान मुलांपासून नव्वदीतील व्रतस्थ धोंड सहभागी होतात. युवती आणि महिलाही अग्निदिव्य साकारतात. दरम्यान, यावर्षी जत्रोत्सवात गोबी मंच्युरियन विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"