लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणेः गोमंतकच नव्हे, तर गोमंतकाबाहेर सर्वदूर असलेल्या लाखो भक्तांचे अढळ श्रद्धास्थान म्हणजे देवी लईराई. देवी लईराईचे निस्सीम भक्त म्हणजेच 'धोंड' गावागावात जत्रेच्या आधी बरेच दिवस सोवळेओवळे पाळताना स्वतःच्या कुटुंबापासून घराबाहेर एका विशिष्ट जागी थांबून आपल्या व्रताला प्रारंभ करतात. जत्रोत्सवाने व्रताची सांगता करतात. आगरवाडा येथील दामाजी वाड्यावर आजही ही शेकडो वर्षांची परंपरा अखंडपणे सुरू आहे.
चुडतांच्या मंडपात, सोवळ्याने व्रत
सुरुवातीला आंब्याच्या झाडाखाली चुडतांचा मांडव घालून धोंड परंपरा अखंडपणे सांभाळणारे अनेक जण देवाला प्रिय असले, तरी त्यांचे वारसदार ही परंपरा अखंडितपणे सांभाळून आहेत. दामाजी वाड्यावरील धोंड गणामध्ये अगदी १५ वर्षे वयोगटापासून ५६ वर्षे वयोगटातील धोंडांचा समावेश आहे. यात दशरथ दमाजी, मनोज सांगाळे, संदीप दमाजी तेजस सातार्डेकर, अनंत दमाजी, अजय दमाजी, अरुण सोमजी, तुळसीदास दमाजी, वसंत दमाजी, विश्वास मांद्रेकर, संतोष दमाजी, नीलेश पोखरे, शिवराम केरकर, शशिकांत पोखरे, सोनू आरोसकर, भालचंद्र मांद्रेकर, विवेक बांदेकर, प्रीतेश दमाजी, अनिल मांद्रेकर व इतरांचा समावेश आहे. त्यात अनिल मांद्रेकर, भालचंद्र मांद्रेकर हे ज्येष्ठ धोंड आहेत.
आठव्या वर्षापासून व्रत : केरकर
आपण वयाच्या आठव्या वर्षापासून अखंडितपणे हे व्रत करीत आहे व धोंड व्रताला आज ४४ वर्षे पूर्ण होत असल्याचे अनिल केरकर यांनी सांगितले. आपल्या वडिलांच्या निधनानंतर ही परंपरा सांभाळत आहेत, तर प्रतीक कळंगुटकर हा युवक सर्वांत लहान वयाचा आहे.
जिल्हा पंचायतीने बांधले लाईराई सभागृह
सुरुवातीला हे धोंड चुडताच्या झावळ्यांचा मंडप उभारून त्यात आपले धोंड व्रत करण्यासाठी त्या ठिकाणी थांबायचे. त्याच मंडपात जेवण शिजवायचे, त्याच ठिकाणी झोपायचे. आज माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर व विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी जिल्हा पंचायत फंडातून याठिकाणी सभागृह बांधले आहे. आज आम्ही लईराई सभागृहामध्ये धोंड व्रत पाळतो, असे त्यांनी सांगितले. देवी लईराईचे आम्ही धोंड अमावास्येपासून घरातून बाहेर पडतो, ते जत्रा झाल्यानंतर घरात राहायला जातो, असे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"