पणजी : गोव्यातील दोन दिवसांचा दौरा आटोपून राष्ट्रपती रामनाथ कोविंद दुपारी सपत्निक दिल्लीला परतले. त्याआधी सकाळी त्यांनी जुने गोवें येथील जगप्रसिध्द बॉ जिझस बासिलिका चर्च तसेच मंगेशी येथील मंदिराला भेट दिली. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा, गोव्याचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे त्यांच्यासोबत होते.
राष्ट्रपतींनी जुने गोवे चर्चला भेट देऊन सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सुमारे २0 मिनिटे ते या चर्चमध्ये होते. बासिलिका चर्चचे रेक्टर फादर पेट्रीसियो फर्नांडिस यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली. आपण याआधीही या चर्चला भेट दिल्याचे आणि येथे येऊन आपल्याला धन्य वाटले, असे कोविंद यांनी त्यांना सांगितले. फर्नांडिस हे नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘मी त्यांना चर्चचा इतिहास सांगितला. १९५२ पासून सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव या ठिकाणी अबाधित आहे हा एक चमत्कार असल्याचेही त्यांना सांगितले.’ कोविंद यांनी गोव्यावर पावसाच्या रुपानेही ईश्वराने कृपा केली आहे.,’ अशी टीप्पणी त्यांच्याशी केली.
राष्ट्रपतींनी चर्चमधील ‘गोल्डन रोझ’च्या ठिकाणी चर्चचे रेक्टर तसेच इतरांबरोबर फोटोही काढून घेतले. हे सुवर्ण गुलाब पोपनी ‘डियोसिस आॅफ गोवा’ला दिले होते.
राष्ट्रपती नंतर मंगेशीला गेले. तेथे देव मंगेशाचे दर्शन घेतल्यानंतर ते पणजीकडे रवाना झाले. कोविंद हे काल सकाळी सपत्निक गोव्यात आले होते. काल दुपारी ते गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले तर सायंकाळी त्यांचा राज्य सरकारतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. काल रात्री ते दोनापॉल येथील राजभवनवर मुक्कामाला होते. आज सकाळी कोविंद दांपत्याने राजभवनही वृक्षारोपण केले. या प्रसंगी राज्यपाल मृदुला सिन्हा तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या ज्येष्ठ न्यायमूर्तींनी सकाळी राष्ट्रपतींची भेट घेतली. न्यायमूर्ती एन. एम. जमादार, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण, न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग, न्यायमूर्ती नूतन सरदेसाई हे यावेळी उपस्थित होते.