पणजी - राज्यातील जमिनींचा झोन बदलण्याची अधिसूचना सरकारने जारी करून गोव्यातील उरल्यासुरल्या छोट्या जमिनींची आता किरकोळ पद्धतीने विक्री चालवली आहे. ओडीपींमध्ये घोटाळे केल्यानंतर सरकारमधील मंत्री, आमदारांनी आता निवडणूक निधी गोळा करण्यासाठी झोन बदलाचा शॉर्ट कट शोधून काढला, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नाडिस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच काँग्रेसचा यास आक्षेप असल्याचे स्पष्ट केले.
मोठमोठ्या जमिनी अगोदरच दिल्ली व अन्य भागातील बिल्डरांसाठी रुपांतरित करून दिल्या गेल्या. आता झोन बदलाची कल्पना सरकारने पुढे आणली. गोव्याच्या भावी पिढीला जमिनीच शिल्लक ठेवायच्या नाहीत असे मंत्री, आमदारांनी ठरवून टाकले आहे. ओडीपींमध्ये घोटाळे झाल्याने कायद्याच्या कसोटीवर ते टीकणार नाहीत हे राजकारण्यांना ठाऊक आहे. विशेषत: कळंगुटच्या लोकप्रतिनिधीला तर ते पूर्ण ठाऊक आहे. यामुळे ऑचर्ड जमिनींच सेटलमेन्टमध्ये व मग औद्योगिक वापरासाठी म्हणून रुपांतरित करण्याची कल्पना सरकारने शोधून काढली. ओडीपींमध्ये श्रीमंत बिल्डरांना लाभ देण्यासाठी सरकारमधील घटकांनी पैसे घेतले. आता छोट्या छोट्या ऑर्चड जमिनीही रुपांतरित करून दिल्या जातील, असे फर्नाडिस म्हणाले.
परप्रांतीय बिल्डरांना लाभ
गोमंतकीय माणूस हा डोंगर व टेकड्यांवर जमीन घेत नाही. कारण तिथे बांधकाम करता येत नाही अशी भीती त्याच्या मनात असते. गोव्याबाहेर बिल्डरांनी मात्र गोव्यातील डोंगरांवर जमिनी खरेदी केल्या आहेत. हिरव्या जमिनी आता सेटलमेंटमध्ये रुपांतरित केल्या जातील. झोन बदलासाठी शूल्क लागू करून तशी अधिसूचना ही परप्रांतीय बिल्डरांच्याच हितासाठी आणली गेली आहे, असे फर्नाडिस म्हणाले. गोव्यावर सत्ताधाऱ्यांनी बलात्कार चालवला आहे, हे गोंयकारपण नव्हे, अशी टीका फर्नाडिस यांनी केली.
किनाऱ्यांवर कचरा
दरम्यान, सरकारमधील काही मंत्री प्रशासन ठप्प झाले असे म्हणतात तर काहीजण निषेध म्हणून सचिवालयातच जात नाही. किनाऱ्यांवर कचरा साठला आहे. पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे, असे फर्नाडिस म्हणाले. अगोदर रशियामधून आठवडय़ाला 12 चार्टर विमाने येत होती. आता फक्त चारच विमाने येतात. लंडनमधून आठवड्याला आठ विमाने येत होती. आताही तेवढीच येतात, त्यांची संख्या वाढली नाही. गोव्यात केवळ ट्रॅक्स व अन्य वाहनांमधून कमी खर्च करणारे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शेतात जाऊन स्वयंपाक करणारे पर्यटक येत आहेत, असे फर्नाडिस म्हणाले. साळगावच्या कचरा प्रकल्पापासून चार किलोमीटर अंतरावरील परिसरात खूप दुर्गंधी येते, असेही ते म्हणाले.