पणजी : गोवा हे देशातील पहिले राज्य असेल, जेथे स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये या राज्यातील एक लाख महिलांची तपासणी केली जाईल, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे सांगितले. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय हेल्थ मिशनने हा कार्यक्रम मंजूर केला आहे. पूर्वीप्रमाणे महिलांच्या तपासणीसाठी मोठे वाहन घेऊन फिरण्याची आता गरज राहिलेली नाही. एक छोटे उपकरण उपलब्ध झालेले असून त्या उपकरणाद्वारे महिलांची चाचणी केली जाईल. विशेष म्हणजे गोव्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या कामासाठी वापरले जाणार आहे.
15 लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात अर्धी लोकसंख्या महिलांची आहे. त्यापैकी एक लाख महिलांची तपासणी अगोदर केली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. लाइव्ह सायन्स या यंत्रणोशी सरकारचा लवकरच करार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्तनांच्या कर्करोगाच्या दृष्टीकोनातून केलेल्या चाचणीवेळी जर एखाद्या महिलेला कर्करोगाची लक्षणे दिसून आली, तर त्यानुसार उपचार तरी करून घेता येईल. तपासणीच केली नाही तर रोगाचे निदान होऊ शकणार नाही, असे मंत्री राणे म्हणाले. देशात अजून अशा प्रकारचा प्रकल्प अन्य कुठेच राबवला गेलेला नाही असेही ते म्हणाले.
आयस्टॅट यंत्रही आरोग्य खात्याकडून खरेदी केले जाणार आहे. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आयस्टॅट यंत्र उपलब्ध केले जाईल आणि मग तिथे त्या यंत्रद्वारे एकूण 25 प्रकारच्या रक्त चाचण्या करता येतील. एकदा रक्त काढले की, 28 प्रकारच्या चाचण्या करता येतील. लगेच अहवाल मिळण्याची सोय होईल, असे मंत्री राणो म्हणाले.
राज्यात लवकरच आम्ही डायबेटीक केअर कार्यक्रम सुरू करणार आहोत. या कार्यक्रमानुसार सर्व आरोग्य केंद्रांमध्ये व इतरत्र इन्सुलीन मोफत दिले जाईल. नोवा नॉर्डीस्क संस्थेच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत. मधुमेह झालेल्या व्यक्तीची पूर्ण काळजी ह्या कार्यक्रमानुसार घेतली जाईल. डायबेटीक रजिस्ट्री ठेवली जाईल, असे मंत्री राणे म्हणाले.