निवृत्ती शिरोडकर :
मांद्रे (गोवा) : गोव्याच्या इतिहासात मी जायंट किलर ठरल्याचा अभिमान असल्याचे काँग्रेसचे मांद्रे विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार दयानंद सोपटे यांनी विजयानंतर विलक्षण जोशात सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दारुण पराभव केल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. विजयानंतर सोपटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी मांद्रे मतदारसंघात नवा होतो, तेव्हाही पाच वर्षांपूर्वी फाईट दिली होती. एक हजार मतांचा फरक होता. आता मात्र गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव मी केल्याने खूप आनंद झाला. विजयाचे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना जाते, त्यांनी आणि जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, अशा शब्दांत सोपटे यांनी भावना व्यक्त केल्या. आनंदाचे भरते आल्याचे त्यांची देहबोली सांगत होती. पार्सेकर यांनी या निवडणुकीत १0 कोटी खर्च केल्याचा आरोप सोपटे यांनी केला. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून ९ हजार मतेही ओलांडता आली नाहीत.
२0१२ च्या निवडणुकीतच मी निवडून येणार होतो; परंतु त्या वेळी स्वकीयांनीच घात केला. काँग्रेसच्या नेत्यांनीच त्या वेळी विरोधात काम केले. माझ्यासाठी न वावरता ते गप्प जरी बसले असते तरी मी त्या वेळी निवडून आलो असतो. मांद्रेत मी त्या वेळी नवा होतो. गेल्या १७ वर्षांत माणसे जोडली त्याचे फळ आता मिळाले. चौकटी काँग्रेसची एकी मांद्रेतून कॉँग्रेसचा विजय त्या वेळीच निश्चित झाला होता, ज्या वेळी निवडणूक जाहीर होऊन सर्व इच्छुक कॉँग्रेस नेते केवळ मुख्यमंत्र्यांना घरी पाठवायचे हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून एकत्रित आले होते. कॉँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दयानंद सोपटे यांच्या विजयासाठी तहान-भूक विसरून काम केले आणि नवा इतिहास घडविला. कॉँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे बंडखोरी झालेली नाही.
पराभवाची काही कारणे अशी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव होण्यासाठी अनेक कारण आहेत. त्यातील मांद्रे कॉलेजवर केलेला अन्याय, सीआरझेड विषय, शॅक व्यावसायिकांवर परवाने देताना अन्याय, केरी-तेरेखोल जमीन विक्री, लिडिंग हॉटेल प्रकल्प, तेरेखोल नदीत बेकायदा ड्रेजिंग, बेरोजगारी, शासकीय नोकऱ्या ठराविक समाजाच्या लोकांनाच प्राधान्यक्रमाने देणे, नोकरी मागायला गेलेल्यांचा अपमान करणे या अनेक कारणांमुळे मुख्यमंत्र्यांवर मांद्रेवासीय नाराज होते. मुख्यमंत्री बनल्यानंतरच्या काळात तर मतदारसंघासाठी वेळच दिला नाही, हेही एक कारण आहे.