पणजी : आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी सायंकाळी कार्डिनल आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांची भेट घेतली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाताळाच्या शुभेच्छा राणे यांनी कार्डिनलपर्यंत पोहचविल्या. गेल्या वर्षीही मंत्री विश्वजित यांनी फिलीप नेरी फेर्राव यांची नाताळ सणानिमित्त भेट घेतली होती. आज आल्तिनो येथील आर्चबिशप पेलेसमध्ये मंत्री राणे व पत्नी आमदार डॉ दिव्या राणे यांनी कार्डिनल फेर्राव यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांचा संदेश घेऊन आपण आलो आहोत, त्यांनीही तुम्हाला नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे राणे यांनी फेर्राव यांना सांगितले.
त्यावर आपले आशीर्वाद आणि सदिच्छा तुम्ही पंतप्रधानांना कळवा, आपण त्यांच्या नाताळ शुभेच्छांचा स्वीकार करत असल्याचे फेर्राव यांनी राणे यांना सांगितले. राज्यातील काही विषयांवरही यावेळी उभयतांमध्ये मोघम चर्चा झाली. फिलीप नेरी फेर्राव हे गोव्यातील ख्रिस्ती समाजाचे सर्वात मोठे धर्मगुरू आहेत. गोव्यात सर्वत्र नाताळ सणाचे वातावरण असून लाखो पर्यटकही नाताळ सणानिमित्त गोव्यात आनंद घेण्यासाठी आले आहेत. जुनेगोवे येथील जगप्रसिद्ध चर्च परिसरात आज शनिवारी दिवसभर हजारो देश विदेशी पर्यटकांची गर्दी होती.