मडगाव : केपेचे आमदार बाबू कवळेकर यांच्यावर चतुर्थीनंतर कारवाई केली जाईल, असे संकेत शासकीय पातळीवरून मिळत असताना बुधवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कवळेकर यांच्या नाकेरी-बेतूल येथील बंगल्यावर छापा घातल्याने पुन्हा एकदा कवळेकर यांचे नाव चर्चेत आले आहे. या छाप्याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. औद्योगिक महामंडळाचे माजी अध्यक्ष असलेले कवळेकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अनधिकृत मालमत्ता सांभाळल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. मागचे वर्षभर याप्रकरणी त्यांची चौकशी चालू आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बोसूएट सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली छापा घालण्यात आला. कवळेकर यांनी हा छापा नसल्याचा दावा केला असला तरी त्यांच्या बंगल्याच्या मूल्यमापनासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मूल्यमापन अधिकाऱ्याला बोलावले होते, अशी माहिती प्राप्त झाली. या बंगल्याचा आराखडा व इतर कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे मूल्यमापन होऊ शकले नाही. या संदर्भात आमदार कवळेकर यांना विचारले असता, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आपल्या घरी आले होते, ही गोष्ट जरी खरी असली तरी तो छापा नव्हता, असे ते म्हणाले. माझ्यावर जे एफआयआर दाखल झाले आहे, त्या संदर्भात मागचे वर्षभर माझी या विभागाकडून चौकशी चालू आहे. कित्येकवेळा मी या विभागाला माहिती देतो त्याची खातरजमा करण्यासाठी अधिकारी माझ्या घरी येतात. बुधवारची ही भेट अशीच होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या कारणावरून माझी जबानी घेतली जाते. मीही त्यांना आवश्यक असलेले सहकार्य करत आहे. या चौकशीला आपला कसलाच आक्षेप नाही. (प्रतिनिधी)
बाबू कवळेकर यांच्या बंगल्यावर छापा
By admin | Published: September 19, 2014 1:42 AM