म्हापसा : उत्तर गोव्यात कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात घडलेले भांग प्रकरण तेथील साहाय्यक जेलर व जेलगार्डला चांगलेच भोवले आहे. कारागृहाच्या प्रशासनाने घडलेल्या या प्रकारात पाच जणांना जबाबदार धरुन त्यांना सेवेतून निलंबीत करण्याचा आदेश काढला आहे.
मंगळवारी रात्री महाशिवरात्री दिवशी कारागृहातील कर्मचाºयांनी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती करण्याचा प्रकार घडला होता. सुमारे २० कैदी व जेलगार्ड या दंगामस्तीत सहभागी झाले होते. अती प्रमाणात भांग प्राशन केल्यानंतर उलट्या सुरु झाल्याने एक जेलगार्ड तसेच दोघा कैद्यांना नंतर तातडीने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्याची पाळी कारागृहाच्या प्रशासनावर आली होती.
कारागृहात घडलेल्या या प्रकाराची नंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. केलेल्या अंतर्गत चौकशी नंतर कारागृहात त्या रात्री ड्युटीवर असलेले साहाय्यक जेलर शिवप्रसाद लोटलीकर याला जबाबदार धरुन सेवेतून निलंबीत केले आहे. तसेच चार जेलगार्ड राजेंद्र वाडकर, कायतान गुदिन्हो, किरण नाईक व विजय देसाई यांनाही निलंबीत केले आहे. निलंबीत करण्यात आलेल्या किरण नाईक याने अतिप्रमाणावर भांग प्राशन केल्याने त्यालाही उलट्या होऊन उपचारासाठी दाखल करणे भाग पडले होते. तसेच इतर दोन कैदी सुर्वेश उर्फ बाबू आरोलकर व विनय गडेकर यांनाही उपचारार्थ दाखल करण्यात आलेले. उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आलेला.
तीन वर्षा पूर्वी या कारागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर तेथे घडणा-या घटनांमुळे सतत चर्चेत राहिले आहे. कारागृहाच्या महानिरीक्षकांचा तसेच इतर अधिकाºयांचा कारागृहावर ताबा नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे आरोपही केले जात आहेत. कारागृहाच्या प्रशासनाकडून कारागृहाची वेळोवेळी तपासणी केली जात नसल्याचेही आरोप केले जात आहेत.
मंगळवारी कारागृहात घडलेल्या प्रकाराच्या संशयाचे वलय कारागृहातील एक कैदी अनिल भुई याच्या भोवती आहे. त्याने दुधात भांग मिसळून नंतर ते प्यायला दिल्याचा आरोप केला जात आहे. तशी तक्रार अधीक्षक नारायण प्रभूदेसाई यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याची तसेच कारागृहातील इतर कैद्यांची चौकशी केली होती.
घटनेनंतर कारागृहातून ताब्यात घेण्यात आलेले भांग सदृश पेय नंतर चाचणीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पुढील काही दिवसात त्याचा अहवाल अपेक्षीत आहे. या अहवालानंतर दुधात नक्की काय मिसळण्यात आले होते यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत घटनेनंतर कारागृहाच्या प्रशासनाची बरीच नाचक्की झाली आहे.