लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: तुरुंग म्हटले की, तिथे अगदी उदास व दुःखाचे साम्राज्य असेल असा समज जर कुणी करून घेतला असेल तर त्यांनी कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगाची एक सफर जरूर करावी तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी रविवारी कोलवाळ तुरुंगाला आकस्मिक भेट दिली असता, त्यांना कैद्यांकडे ८ मोबाइल, स्पीकर्स, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या आणि तुरुंगातील वास्तव उघड झाले.
गोवा पोलिसांकडे तुरुंग व्यवस्थापन सोपविल्यानंतर यामध्ये चांगल्या सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कारण वरिष्ठांकडून सध्यातरी वारंवार अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचे काम सुरू आहे. तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी रविवारी सकाळी कोलवाळ तुरुंगात अचानक पाहणी केली. - त्यावेळी तरुंगातील कैदी आपल्याच विश्वात दंग असल्याचे त्यांना आढळून आले. कुणी मोबाइलवर बोलण्यात दंग होते तर कुणी हेडफोनवर संगीत ऐकण्यात दंग अशी स्थिती होती.
तुरुंग महानिरीक्षकांच्या आगमनामुळे आवराआवरी झाली, परंतु त्यांनी कैद्यांच्या लॉकअपची तपासणी सरू केली. तेव्हा त्यांना एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी सापडू लागल्या. कैद्यांना तुरुंगात मोबाइल नेण्यास बंदी असली तरी कैद्यांच्या लॉकअपमध्ये ८ मोबाइल सापडले. इअर फोन आणि हेडफोनही सापडले. इतकेच नव्हे तर ब्ल्यूटूथ स्पीकर आणि तुरुंगात वापरण्यास बंदी असलेले इतर साहित्यही सापडले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून ते कैद्यांकडे कसे पोहोचले याविषयी तुरुंग अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
स्पीकर वाजतात तेव्हा...
तुरुंगात मोबाइल, इअरफोन, स्पीकर व इतर साहित्य कसे पोहोचले? या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत तुरुंग प्रशासनाने दिलेले नाही. तसेच मोबाइल, इअरफोन व हेडफोनचा वापर कैद्यांकडून चोरून केला जात असल्याचे स्पष्टीकरण एकवेळ समजण्यासारखे आहे. परंतु, स्पीकरचा वापरही चोरून होतो हे कळण्यापलिकडे आहे. कारण मोबाइलला ब्ल्यूटूथद्वारे कनेक्ट करून मोठ्याने वाजविले जाणारे हे हायडेफिनेशन स्पीकर वाजतात, तेव्हा अधिकारी काय झोपा काढतात का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
कैद्यांना मारहाण?
कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातील या तपासणीवेळी काही बरॅकमध्ये अमली पदार्थ, तंबाखूसह इतर साहित्य सापडले व ते जप्त करण्यात आले. यावेळी काही कैद्यांनी तपासणीस विरोध केल्याने त्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. बरॅक क्रमांक ४ तसेच अमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यांखाली अटक करण्यात आलेल्या बरॅकमध्ये तपासणी करण्यात आली. या दोन्ही बरॅकमध्ये अंडरट्रायल कैद्यांना ठेवण्यात येते.
आयआरबी जवान कारवाईपासून दूर
कारवाईसाठी महानिरीक्षकासोबत आतंकवादी विरोधी पथकाचे (एटीएस) जवान आले होते. सर्वजण साध्या देशात होते. येथ असलेल्या सर्वांना या जवानांच्या मदतीने बाहेर काढून नंतर तपासणी करण्यात आली. कारागृहाला सुरक्षा पुरवणाच्या आयआरबीच्या जवानांना सुद्धा या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. काही बरॅकची कडक तपासणी करण्यात आली.
तपासणीला विरोध...
तपासणीवेळी काही कैद्यांनी विरोध केला. त्यावेळी साध्या वेशातील एटीएसच्या जवानांनी अशा विरोध करणाऱ्या कैद्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला; मात्र कैदी ऐकत नसल्याने त्यांना मारहाण करण्यात आल्याची चर्चा आहे. यात शिक्षा भोगत असलेल्या काही स्थानिक तर काही नायजेरियन कैद्यांना दुखापत झाली; मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कारागृहातील दवाखान्यात उपचार करण्यात आले नव्हते. कारवाईची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी या कैद्यांवर लगेच उपचार करण्यात आले नाहीत, असेही सांगण्यात आले. मारहाणीचा विरोध करणारे काही कैदी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही सांगण्यात येते.
ही एक नियमित स्वरुपाची कारवाई होती. अशा पाहणी वेळोवेळी केली जाईल. या पाहणीत सापडलेल्या वस्तू व जी काही चौकशी वगैरे असेल, तो तुरुंग प्रशासनाचा अंतर्गत मामला आहे. याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. - ओमवीर सिंग विश्नोई, तुरंग महानिरीक्षक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"