लोकमत न्यूज नेटवर्क मडगावः मडगावच्या कदंब बस स्थानकावर आज सकाळपासून खासगी इलेक्ट्रिक बस चालकांनी पगारवाढीसाठी आकस्मिक संप पुकारल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. नंतर आगर व्यवस्थापकाने इलेक्ट्रिक बस चालविण्यात प्रशिक्षित असलेल्या कदंबच्या बस चालकांना इलेक्ट्रिक बसेसचा ताबा देऊन २२ बसेस सुरू केला. मडगाव-पणजी व मडगाव- वास्कोच्या मार्गावर जाणाऱ्या विशेषत: सरकारी कर्मचाऱ्यांवर बस चालकांच्या संपाचा परिणाम झाला.
मडगावच्या कदंब स्थानकावरून सकाळी ६ वाजल्यापासून बस सेवेला सुरूवात होते. एकही इलेक्ट्रिक बस स्थानकावर आली नाही. मात्र नेहमीप्रमाणे काऊंटरवर तिकिटे घेऊन प्रवासी बसच्या प्रतीक्षेत उभे राहिले. तिकिट काऊंटरवर प्रवाशांची गर्दी वाढली असतानाच अचानक बसचालक संपावर गेल्याने प्रवासी संतप्त बनले. नंतर आगार व्यवस्थापक गिरीश गावडे यांनी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या कदंबच्या चालकांना इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा आदेश जारी केला. महामंडळाने बस स्थानकावर प्रवाशांती वाढती गर्दी लक्षात घेऊन इलेक्ट्रिक बसेस व इंधनाच्या बसेस मार्गावर सुरू केल्या. मडगाव-पणजी व मडगाव वास्को मार्गावर २२ इलेक्ट्रिक बसेस सोडल्या. इतर इंधनाच्या बसेस सुरू करून प्रवाशांची सोय केली.
मडगावच्या कदंब बस स्थानकावरून ६० इलेक्ट्रिक बसेस प्रवासी वाहतूक सेवा करतात. सर्व इलेक्ट्रिक बसचे चालक आकस्मिक संपावर गेल्याने सकाळपासून प्रदीर्घकाळ नोकरवर्ग स्थानकावर अडकून पडला. तरी कदंब महामंडळाने परिस्थिती लक्षात घेऊन तडका फडकी पर्यायी व्यवस्था केली.
२५ हजार रुपये वेतन द्या...
कदंब परिवहन महामंडळातर्फे चालणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस कदंबच्या मालकीच्या नसून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या आहेत. त्यामुळे बस चालकांच्या संपाशी कदंबचा संबंध नाही. या इलेक्ट्रिक बसच्या चालकांना किमान वेतन २० हजार रुपये असून १८ हजार रुपये हातात मिळतात. त्या चालकांच्या म्हणण्यानुसार त्यांना कंपनीकडून २५ हजार रुपये वेतन मिळणे अपेक्षित आहे. इलेक्ट्रिक बसच्या चालकांनी पगारवाढीसाठी हा आकस्मिक संप पुकारून प्रवाशांना वेठीस धरले.
'ओलेक्ट्रा ग्रीनटेक'ने निर्णय घ्यावा
राज्यात कदंब परिवहन महामंडळातर्फे चालणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस महामंडळाच्या मालकीच्या नसून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या खासगी कंपनीच्या आहेत. सर्व बसचालक त्याच कंपनीचे असून वाहक महामंडळाचा आहे. त्यामुळे बस चालकांच्या संपाशी कदंब महामंडळाचा काहींच संबंध नाही. त्यांच्या वेतनाची समस्या सोडविण्याची जबाबदारी त्याच कंपनीची आहे. ती कंपनी बस चालकांना वार्षिक ५ टक्के वाढ देते. इलेक्ट्रिक बस चालकांनी कदंब महामंडळाला कोणतीही पूर्वकल्पना न देता हा संप पुकारलेला आहे. आंदोलक चालकांनी विनाकारण प्रवाशांना वेठीस धरू नये. त्यांना आजच कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्हावे. पर्यायी व्यवस्था केली असून लोकांना कोणताही त्रास होणार नाही. आमदार उल्हास तुयेकर, अध्यक्ष, कदंब महामंडळ,
आगार व्यवस्थापकांनी त्या सर्व बस चालकांना संध्याकाळी सेवेत रुजू होण्यासाठी कळविले आहे. बस चालक कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. संध्याकाळपर्यंत बस चालकांनी सेवा सुरु केली नसल्यास नवीन बस चालकांना सेवेत घेऊन महामंडळ प्रवासी सेवा सुरू करणार आहे. - उल्हास तुयेकर, चेअरमेन, कदंब महामंडळ