लोकमत न्यूज नेटवर्क हरमल: येथील केरी- हरमल म्हापसा मार्गावर खासगी प्रवासी बस अपुन्या व अनियमित असल्याने विद्यार्थी तसेच नोकरदार, कामगारांसाठी बरीच कुचंबणा होत आहे. मागणी करूनही कदंब बससेवा सुरू होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गेली १५ दिवस या प्रमुख मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. कदंबच्या अवघ्याच बस प्रवाशांची सोय करीत असल्याचे चित्र आहे. या मार्गावरील खासगी बसची आकस्मिक तपासणी करण्याची गरज आहे. वाहतूक खात्याचे अधिकारी केवळ चलन देण्यात धन्यता मानत असल्याने प्रवासी अनिकेत नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
दुपारच्या वेळेत तब्बल दीड तासाने म्हापसाहून मांद्रे, हरमल प्रवासी बसफेरी असते. दुपारी एक-सव्वा एकची बस चुकल्यास, प्रवाशांना दुपारी तीनच्या बसवर अवलंबून राहावे लागते व ती बस पाच-दहा मिनिटे असताना, स्थानकावर येत असल्याने वृद्ध प्रवाशांना बसमध्ये बसण्यास जागा मिळणे कठीण होत असते. त्यासाठी वाहतूक खात्याने कडक भूमिका घेण्याची मागणी वृद्ध प्रवाशांनी केली आहे.
रविवारी बहुतेक बस बंदच
गेली काही दिवस अनेक खासगी बस फेया रविवारी बंदच असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अनेक विद्यार्थी रविवारी खासगी ट्युशनसाठी घराबाहेर पडतात, पण बसच नसल्याने त्यांना ट्युशनला जाता येत नाही. त्यामुळे खासगी प्रवासी बस मालकांना नियमांचे पालन करण्याची सक्ती वाहतूक खात्याने केली पाहिजे, असे मत अनिकेत नाईक यांनी व्यक्त आहे.
...अन्यथा कदंब महामंडळाने सेवा सुरु करावी
खासगी बस मालक मनमानी कारभार करत असल्याने, कदंब महामंडळाने या मार्गावर दोन फेऱ्या वाढवून घेतल्यास प्रवाशांना बरेच सोयीचे ठरेल. सकाळी दहापर्यंत कदंब बसफेरी सुरू केल्यास प्रवाशांना फायदेशीर होईल. त्या वेळेतच मोठ्या संख्येत लोक घराबाहेर पडतात. त्यामुळे या फेरीतून कदंबलाही चांगला महसूल मिळेल, असे नाईक यांनी सांगितले.
खासगी प्रवासी बसच्या सेवेवर वाहतूक खात्याचे नियंत्रण नसल्याने बसफेऱ्यांमध्ये अनियमितता वाढत आहे. वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ तालांव देण्यावरच भर न देता, वाहतूक सेवा नियमितपणे होईल व प्रवाशांना सोयीचे होईल, याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.