पणजी : दक्षिण गोव्यातील नवे हॉस्पिसियो इस्पितळ चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी नव्या खासगी मेडिकल कॉलेजची आणि सार्वजनिक खासगी भागीदारीचे (पीपीपी) सूत्र स्वीकारण्याची गरज आहे. नवे पीपीपी सूत्र राज्य सरकारने ठरविलेले नाही, तर केंद्र सरकारने निश्चित केले असून, त्यास नीती आयोगाचीही मान्यता आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेसला जर हे मॉडेल मान्य नसेल तर त्या पक्षाने त्याविरुद्ध न्यायालयात जावे, असाही सल्ला मंत्री राणे यांनी दिला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अगोदर विषय समजून घ्यावा. कोणतेही इस्पितळ असो, ते चालविण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. सार्वजनिक खासगी सहभागातून (पीपीपी) तज्ज्ञांचा समावेश इस्पितळाच्या काही सेवांमध्ये होत असतो. पीपीपी सूत्र स्वीकारले म्हणजे राज्य सरकारला वाट्टेल ते काहीही करता येत नाही. मी कोणताही निर्णय घेतला तरी, तो शेवटी मंत्रिमंडळासमोर जावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने ठरविलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच काही सेवांचे खासगीकरण करता येते. मला याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही पत्र पाठविले असून, त्यांनी पीपीपी तत्त्वावर दक्षिण गोव्याच्या इस्पितळाशी निगडीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे, असे राणे यांनी सांगितले.हॉस्पिसियो इस्पितळाला जोडून खासगी वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिल्यास त्याचा लाभ सासष्टीला व दक्षिण गोव्याला होणार आहे. काँग्रेसला जर यात गैरकारभार दिसत असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयात जावे. राज्यात काँग्रेसची अवस्था सध्या खूप वाईट झालेली आहे. आपले वडील प्रतापसिंग राणे यांच्या नावाचा वापर चोडणकर हे स्वसंरक्षणासाठी करतात व माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे राज्यात काँग्रेस पक्ष कधीच सत्तेवर येणार नाही, असेही मंत्री राणे म्हणाले.
''इस्पितळासाठीचे खासगी सहभाग सूत्र हे केंद्राच्या मान्यतेनुसारच''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 7:29 PM