पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी-गोवा: राजकीय पक्षांना मिळालेल्या इलैक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी करणारी तक्रार आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी सीबीआयकडे केली आहे. भाजपसह विविध राजकीय पक्षांना कोटयावधी रुपयांचे इलैक्ट्रॉल बॉण्ड मिळाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी सत्य काय ते जनते समोर उघडकीस येणे गरजेचे आहे. या विषयी अजूनही कारवाई का झाली नाही? असा प्रश्नही ताम्हणकर यांनी केला.
ताम्हणकर म्हणाले की, भाजप, कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून इलैक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून आलेल्या पैशांचा वापर लोकसभा निवडणुकांसाठी केला जात आहे. यात भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. मोठया उद्योगांनी हे इलैक्ट्रॉल बॉण्ड विकास कामांना परवानगी देण्यासाठी, कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तसेच औषध निर्मितीत झालेला घोळ लपवण्यासाठी दिले आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने इलैक्ट्रॉल बॉण्ड प्रकरण उघडकीस आल्यानंतरही सरकार याविषयी गप्प आहे. त्यावर अजूनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचा आराेप त्यांनी केला.