मडगाव : गोव्यातील मुख्य बाजारपेठेचे शहर असलेल्या मडगावात कचऱ्याची समस्या ही लोकांच्या असहकार्यामुळे डोकेदुखी बनलेली असताना या समस्येत भर घालणाऱ्या मोठ्या हॉटेल्स विरोधात मडगाव पालिकेने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत शहरातील 31 आस्थापनांविरोधात पालिकेने दंडात्मक कारवाई केली असून त्यात आयनॉक्स थिएटर, केएफसी, डॉमिनोझ पिझ्झा यांसारख्या बड्या आस्थापनांचा समावेश आहे.
कचरा वर्गीकृत स्वरुपात न देणारी हॉटेल्स व आस्थापने यांच्या विरोधात मडगाव पालिकेने केलेल्या कारवाईत आस्थापनांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा दंड ठोठावला. मडगाव शहरातील कचरा व्यवस्थापन सुरळीत व्हावे यासाठी मडगावातून ओला व सुका कचरा वेगळा करुन द्यावा अशी नोटीस बजावूनही मडगावच्या ब:याचशा हॉटेल्सकडून अजुनही वर्गीकृत स्वरुपात कचरा मिळत नाही. त्यामुळे आता मडगाव पालिकेने त्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरु केली असून मंगळवार व बुधवार असे दोन दिवस चालविलेल्या मोहिमेत एकूण 31 आस्थापनांना दंड फर्मावण्यात आला असून ही मोहीम यापुढेही चालू राहील अशी माहिती मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिली.
पालिकेने कदंब महामंडळ या राज्य वाहतूक मंडळालाही दंड फर्मावला असून या मंडळाच्या मडगाव आगरात मोठय़ा प्रमाणात कचरा साठवून ठेवल्यामुळे त्यांना 2 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती नाईक यांनी दिली. जर यापुढेही अशीच स्थिती राहिल्यास त्यांना 5 हजार रुपयाचा दंड फर्मावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मडगाव पालिकेने घरगुती कचरा उचलण्यासाठीही कचरा वर्गीकरण पद्धती लागू केली असून मिश्र स्वरुपात दिलेला कचरा सध्या पालिका स्वीकारत नाही. अशाप्रकारचा कचरा दिल्यामुळे मडगाव पालिकेने मंगळवारी मडगावातील दोन बडय़ा हाऊसिंग सोसायटीविरोधातही कारवाई केली होती. या कारवाईत नाईक यांच्यासह सफाई निरीक्षक संजय सांगेलकर, पर्यावेक्षक इज्रायल बलभद्रा व ज्योकी फुर्तादो यांनी भाग घेतला.दरम्यान, मडगाव पालिकेच्या बाजार निरीक्षक हसीना बेगम व सीमा घोडगे यांनी प्लास्टीक विरोधी मोहिमेखाली तीन आस्थापनांना दंड फर्मावला. त्यात दुस:यांदा गुन्हा केलेल्या अंबिका चिकन या आस्थापनाला 5 हजार रुपयांचा दंड फर्मावला अशी माहिती नाईक यांनी दिली.