पणजी : गोव्याचे माजी पोलील महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावर असलेल्या लाचखोरीच्या गंभीर आरोपाची चौकशी काम करण्याचे गोव्याच्या लोकायुक्तांनी थांबवलेले नाही. गर्ग यांची गोव्याहून गेल्यावर्षीच बदली झाली तरीदेखील लोकायुक्तांनी व न्यायालयानेही हा विषय गंभीरपण घेतलेला आहे. विशेषत: लोकायुक्त पी. के. मिश्र यांनी गर्ग यांच्या मोबाइलवरील कॉल डिटेल्स सर्व मोबाइल कंपन्यांकडे मागितल्यानंतर गर्ग यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
गर्ग यांनी पोलीस महानिरीक्षकपदी असताना एक एफआयआर नोंद करून घेण्यासाठी आपल्याकडे पाच लाखांची लाच मागितली, असा आरोप गोव्यातील एक व्यावसायिक श्री. हलवाई यांनी केला होता. गोव्यात तेव्हा प्रचंड खळबळ उडाली होती. गोवा विधानसभा अधिवेशनातही त्याबाबत तीव्र पडसाद उमटले होते.
गर्ग हे त्यावेळी आयजीपी पदावर होते. गर्ग यांनी पाच लाखांपैकी काही रक्कम आपल्याकडून स्वीकारलीदेखील असेही हलवाई यांनी जाहीर करून त्याबाबतचे संभाषण असलेली सीडी पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला तसेच अन्य चौकशी यंत्रणांना सादर केली होती. या विषयावरून हलवाई हे न्यायालयातही गेलेले आहेत. लोकायुक्तांसमोरही त्यांची तक्रार आहे. गर्ग हे बदली होऊन दिल्लीला गेलेले असले तरी, गर्ग यांच्यावतीने त्यांचे वकील लोकायुक्तांसमोर उपस्थित राहून सुनावणीवेळी युक्तीवाद करत आहेत. गोव्याच्या मुख्य सचिवांसमोरही गर्ग यांच्याविरोधात तक्रार आहे पण त्याबाबत मुख्य सचिव काही कारवाई करू पाहत नाही, अशी तक्रारदाराची भावना झाल्यानंतरच त्याने न्यायालयात धाव घेतली.
लोकायुक्तांनी गर्ग यांच्यावरील आरोपाचा विषय गंभीरपणे घेऊन अजुनही चौकशी काम सुरू ठेवले आहे. आता गर्ग तसेच तक्रारदार आणि एक मध्यस्थ यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचा वेध घेण्याचा प्रयत्न लोकायुक्त करत आहेत. या तिघांच्या मोबाइल फोनाचे कॉल डिटेल्स लोकायुक्तांनी मागितले आहेत. येत्या 18 डिसेंबर रोजी याबाबत पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान, पणजीच्या सत्र न्यायालयासमोरही गर्ग यांच्यावरील आरोपाविषयीची याचिका प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने आता येत्या आठ आठवड्यांमध्ये या याचिकेसंबंधीत सत्र न्यायालयाने काय तो निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे. यामुळे गर्ग यांच्यासमोरील अडचणींमध्ये भर पडल्याचे पोलिस खात्यातही मानले जात आहे. तक्रारदार हलवाई यांनीच न्यायालयात घाव घेऊन पोलिसांच्या एसीबी विभागाने गर्ग यांच्याविरोधात एफआयआर नोंद करावा, अशी विनंती केली आहे.