लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात तिसरा जिल्हा बनविण्याच्या प्रलंबित मागणीसाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तिसऱ्या जिल्ह्याची शक्यता तासण्यासाठी सात सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असून प्रधान वित्त सचिव, महसूल आयुक्त, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव चारुदत्त पाणिग्रही हे या समितीचे सदस्य आहेत. नियोजन व सांख्यिक खात्याचे संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.
समिती तिसऱ्या जिल्ह्याची शक्यता पडताळून पाहताना अनेक गोष्टींचा अभ्यास करेल. त्यात आर्थिक, सामाजिक, लोकांची मते आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जाईल. प्रस्तावित जिल्ह्याच्या सीमाही ठरविल्या जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल ३ महिन्यांत सरकारला सादर केला जाईल.