पणजी : गोव्यात मद्य उत्पादकांना सरकारने लॉकडाउनच्या काळात मद्य निर्मितीऐवजी हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन करण्यास सरकारने सांगितले होते. त्यानुसार या उद्योगांनी साडेतीन लाख लिटर हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन केले.
अबकारी आयुक्त अमित सतिजा यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. लॉकडाउनमुळे सध्या मद्यनिर्मिती बंद आहे. दारुची घाऊक व किरकोळ दुकाने तसेच बार, तावेर्नही बंद आहेत. लॉकडाउनच्या काळात छुपी दारु विक्री करुन मार्गदर्शक
तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत २0 प्रकरणांमध्ये सुमारे ७९ लाख ४१ हजार रुपये किमतीची २0 हजार लिटर दारु जप्त करण्यात आली. राज्यातील वाइन शॉप खुली करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी गोवा लिकर ओनर्स असोसिएशनने केली आहे.
- मद्य उत्पादन बंद असले तरी मद्याचे कारखाने सॅनिटायझर निर्मितीसाठी चालू आहेत. - लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर आतापर्यंत औद्योगिक वसाहतींमधील सर्व प्रकारच्या कारखान्यांमध्ये ५0 हजार कामगार कामावर रुजू झाले आहेत. - १६,२00 कामगार केवळ फार्मास्युटिकल्स उद्योगांमध्ये काम करत आहेत.- बांधकाम क्षेत्रात ३0५८, इ कॉमर्समध्ये ५३२ तर आयटी क्षेत्रात ५४६ कार्मचारी काम करीत आहेत.