नारायण गावस, पणजी: गोव्यात आयोजित ५४ व्या इफ्फी महोत्सवात आज 'डॅझलिंग द स्क्रीन' या शीर्षकाखालील इन कॉन्व्हर्सेशन या संवाद सत्रात, संस्मरणीय आणि चित्तवेधक चित्रपट तयार करण्याच्या कलाकृतीमध्ये चित्रपट उद्योगातील प्रॉडक्शन डिझायनर, वेशभूषाकार आणि रंगभूषाकारांनी बजावलेल्या भूमिकांसंदर्भात अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. डॉली अहलुवालिया, वैष्णवी रेड्डी आणि प्रीतीशील सिंह डिसूझा - सिनेमा उद्योगातील तीन कुशल व्यावसायिकांनी - सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एसआरएफटीआय) सहकार्याने एनएफडीसीद्वारे आयोजित केलेल्या या संवादात सहभाग घेतला.
प्रॉडक्शन डिझाईन, वेशभूषा आणि रंगभूषा हे चित्रपट निर्मितीतील सर्वात मेहनती विभाग असले तरी, ज्याप्रकारे लोक कलाकारांशी जोडले जातात त्याप्रकारे अजूनही लोक त्यांच्याशी फारसे जोडले जाऊ शकत नाहीत, असे वेशभूषाकार आणि अभिनेत्री डॉली अहलुवालिया यांनी या विचारप्रवर्तक सत्रात बोलताना सांगितले. बॅन्डिट क्वीन, विकी डोनर, हैदर यांसारख्या चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून काम पाहिलेल्या डॉली अहलुवालिया यांनी रंगभूषा आणि वेषभूषेमध्ये लेयरिंग आणि अन-लेअरिंगची जादूदेखील उलगडून दाखवली. अभिनेत्याच्या प्रतिमेला अन-लेयर करण्यासाठी, रंगभूषाकार आणि वेषभूषाकारांना अभिनेत्याला त्या पात्राचा एक थर चढवावा लागतो”, असे त्यांनी सांगितले.
वेशभूषा आणि रंगभूषेमधील धडे त्यांनी सभोवतालचा निसर्ग आणि आजूबाजूच्या निरीक्षणातून घेतले आहेत, अशी आठवण डॉली अहलुवालिया यांनी यावेळी सांगितली. कल्पनाचित्रणाचे वास्तवात रूपांतर होण्यासाठी प्रामाणिक असणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. 'गजनी' आणि 'एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी' सारख्या अनेक समीक्षकांकडून प्रशंसित चित्रपटांमागील निपुण प्रॉडक्शन डिझायनर वैष्णवी रेड्डी म्हणाल्या की, सिनेमा हा चित्रपटाच्या चमू मधील सदस्यांच्या उत्कटतेने चाललेला एक सहयोगी प्रयत्न आहे. ही केवळ नेपथ्य रचना नसून एक वास्तव आहे जे प्रत्येक चित्रपटात पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो, असे वैष्णवी रेड्डी यांनी प्रॉडक्शन डिझाईन आणि नेपथ्य रचनेतील बारीकसारीक बारकावे सांगताना नमूद केले. प्रॉडक्शन डिझायनरला चित्रपटाची भावस्थिती आणि शैलीनुसार राहावे लागते. हा दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनरमधील एक वेगळ्या प्रकारचा स्नेहबंध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक पात्राच्या रचनेमागील मेहनत लक्षात घेऊन प्रीतीशील सिंह डिसूझा म्हणाल्या की, कथा वाचतानाच प्रक्रिया सुरू होते. “कथा वाचताना आपल्या मनात प्रत्येक पात्राबद्दल एक व्यक्तिरेखा तयार होते. प्रत्येक मांडणीमागे एक कथा असते. जरी कथा आम्हाला काम करण्यासाठी व्यापक अवकाश देत असली तरीही दिवसाच्या शेवटी ते दिग्दर्शकाचे मत असते”, असे त्या म्हणाल्या.