लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: म्हादई नदी वाचविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी यासंबंधी उभारण्यात आलेल्या लढ्याला लोकांनी पाठिंबा दिला तरच हा लढा आपण जिंकणार असल्याचा विश्वास प्रा. प्रजल साखरदांडे यांनी व्यक्त केला. 'सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा' संघटनेची बार्देश तालुक्याती बैठक म्हापसा येथील देव बोडगेश्वराच्या सभामंडळात शनिवारी पार पडली. तेव्हा ते बोलत होते.
यावेळी साखरदांडे यांनी लढ्यासंबंधीची पार्श्वभूमी, तसेच माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यातील प्रत्येक पंचायत स्तरावर जागृती करून लोकांना हा विषय पटवून देण्याचे आवाहनही करण्यात आले. महिलांनी लढ्यात उतरून पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली.
म्हादई वाचविण्यासाठी सेव्ह म्हादई सेव्ह गोवा संघटनेकडून उभारण्यात आलेल्या लढ्यात प्रत्येकाने रविवारी (दि.१२) सांजवेळी ७.३० वा. आपल्या घरात दिवा लावून दिव्यासमोर भांड्यात पाणी ठेवावे. त्याचे पूजन करून लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी, अशी विनंती या सभेत सेव्ह गोवाचे अॅड. हृदयनाथ शिरोडकर यांनी सांगितले.
म्हादईचा लढा हा प्रत्येक व्यक्तीने हा लढा आपला वैयक्तिक लढा असे मानून म्हादई वाचविण्याच्या लढ्यात उतरले पाहिजे असे आवाहन करण्यात आले. प्रत्येकाने आपल्या परिसरात जागृतीवर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. म्हादई वाचविणे अत्यंत गरजेचे असल्याचे नगरसेवक शशांक नार्वेकर म्हणाले. यासंबंधी लहान मुलात जागृती करण्यावर भर देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महेश म्हांबरे, ऐश्वर्या साळगांवकर, नगरसेवक शशांक नार्वेकर, माजी नगराध्यक्ष सुभाष नार्वेकर, पार्वती नागवेकर यांनीही विचार मांडले. राजेंद्र घाटे यांनी सूत्रसंचालन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"