फोंडा: खनिज व्यवसायावर गोव्यातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत, याची जाणीव सरकारला आहे. म्हणूनच आम्ही शब्द दिल्याप्रमाणे खनिज व्यवसाय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री व खाणमंत्र्यांच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला असून, एका वर्षात खनिज व्यवसाय सुरू होईल, अशी ग्वाही गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिली.
भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघासाठी फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री गोविंद गावडे, मंत्री बाबू मोन्सेरात, मंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री रोहन खंवटे, मंत्री विश्वजित राणे, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री रवी नाईक मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री नीलेश काब्राल, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार केदार नाईक, डॉ. दिव्या राणे, प्रवीण आर्लेकर, राजेश फळदेसाई, जेनिफर मोन्सेरात, डिलायला लोबो, जोशुआ डिसोझा, प्रेमेंद्र शेट, रुडॉल्फ फर्नाडिस, उल्हास तयेकर दाजी साळकर, गणेश गावकर, संकल्प आमोणकर, दिगंबर कामत, आलेक्स सिकेरा यांच्यासह खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, चंद्रकांत कवळेकर एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.
यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की राज्य मोठे असो किंवा लहान, भाजप कधीच तिथल्या जनतेला गृहीत धरून चालत नाही जेवढे महत्त्व मोठ्या राज्यांना आहे, तेवढेच महत्त्व लहान राज्यांनाही आहे. या उलट काँग्रेस मात्र छोट्या राज्यांना गृहीत धरते. ईशान्येकडील तीन राज्यांत भाजपला या सिद्धांतामुळेच जे यश मिळाले, ते मिळाले. ज्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी गोव्याला फक्त ४३२ कोटी रुपयांचा निधी मिळायचा. आज भाजप सरकारमुळे गोव्याला प्रत्येक वर्षी ३ हजार आहेत.
कोटी रूपये मिळत म्हणूनच आज गोव्याचा चौफेर विकास होताना दिसत आहे. शेजारील कर्नाटक राज्यातसुद्धा भाजपने कधीच निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळेच कर्नाटकातील जनतेचासुद्धा भाजपवरील विश्वास वाढलेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्येही बहुमताने भाजप सरकार स्थापन होणार आहे.
गोव्यात औषधालाही काँग्रेस शिल्लक नाही
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, स्थिर शासन हे स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. आज आपल्या कार्यकुशलतेमुळे प्रमोद सावंत यांनी गोव्यात स्थिर प्रशासन दिले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली गोव्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. आज गोव्यात औषधालासुद्धा विरोधक राहिलेला नाही. हा जसा लोकांचा विश्वास भाजपवर आहे, तसाच गोव्यातील प्रत्येक आमदार, मंत्री यांनी केलेल्या कामाचा तो परिपाक आहे.
मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
गोव्यातील खाणप्रश्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांशी चर्चा करून सोडविला. 'स्वयंपूर्ण गोवा' सारखा उपक्रम राबवून सर्वसामान्यांचा विकास साधण्याची हिमत केवळ मुख्यमंत्री सावंत यांनी दाखवली, असे सांगत गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"