किशोर कुबल, पणजी: ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट जमा केल्याचा दाखला पुरेसा असून यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फाइल मंजूर करुन पोर्तुगीज पासपोर्टधारक मूळ गोमंतकीयांना मोठा दिलासा दिला आहे.
पासपोर्ट जमा केल्याच्या दाखल्याच्या आधारावर आता ओसीआय कार्ड किंवा विदेशी जाण्याचा व्हिसा मिळू शकेल. ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ४ एप्रिल रोजी काढलेल्या निवेदनाच्या बाबतीत मध्यंतरी शुध्दिपत्रक जारी गोंधळ निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. हा गोंधळ आता दूर झाला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्टीट करुन ही माहिती देताना याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत जी आश्वासने दिली होती ती आता परिपूर्ण केली जात आहे. मोदी की गॅरेंटी चालूच राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
ओसीआय कार्डासाठी अर्ज करताना आता पर्यायी दस्तऐवज म्हणून भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचा दाखला जोडता येईल. पोर्तुगीज नागरिकत्त्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांसाठी फार मोठी अडचण निर्माण झाली होती. गोवा सरकारने हा विषय केंद्र सरकारकडे नेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती. पासपोर्ट जमा केल्यानंतर ओसीआय कार्ड मिळविण्यात गोमंतकीयांना अडचणी येत होत्या. पोर्तुगालात जन्मनोंदणी झाली म्हणून भारतीय पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने रद्द करू नये, अशी मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही राज्यसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती.
पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी असल्यामुळे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याचे प्रकार गोव्यात झाले आहेत. याचा अनेक गोमंतकीयांना फटका बसला आहे. पोर्तुगालात जन्म नोंदणी झाली म्हणून सुमारे ७० जणांचे पासपोर्ट रद्द केलेले आहेत.