पणजी - गोव्यात पहिले सेंद्रीय कृषी विद्यापीठ साकारणार आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात नियोजित विद्यापीठाविषयीचा प्रस्ताव थोडा मागे राहिला पण आता हा प्रस्ताव मार्गी लागेल. त्याविषयीच्या विविध निर्णयांची अंमलबजावणी यापुढील काळात होईल, असे गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गुरुवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. कवळेकर यांच्याकडेच कृषी खातेहीआहे.सेंद्रीय कृषी विद्यापीठ प्रकल्प उभा करण्यासाठी आम्ही दक्षिण गोव्यात जमिनही पाहिली आहे. पाच लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीत हा प्रकल्प कशा प्रकारे उभा करावा याविषयी चर्चा झाली आहे. कृषी विद्यापीठ क्षेत्रतील तज्ज्ञांशी सल्लामसलत झाली, असे कवळेकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डीन डॉ. मदन गोपाल वर्षणो यांनी विद्यापीठ उभे करण्यासाठी मार्गदर्शन करून आराखडा ठरवावा म्हणून त्यांची नियुक्तीही झालेली आहे, असे कवळेकर यांनी नमूद केले. वर्षणो हे गुजरातच्या आनंद विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.जमिनीविषयी कायदेशीर सोपस्कार पार पाडणो व अन्य तत्सम प्रक्रिया झाली आहे. लॉकडाऊनमुळे काही तज्ज्ञांचे गोव्यात येणो अडून राहिले होते. आता लॉकडाऊन संपुष्टात आल्यामुळे टप्प्याटप्प्याने पुढील कामे पार पडतील. सेंद्रीय शेतीला गोवा सरकार प्राधान्य देत आहे. नव्या युवकांनी सेंद्रीय शेतीच्या क्षेत्रत उतरावे असे आम्हाला वाटते. शेतीला उद्योग म्हणून तरुणांनी पहायला हवे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण खूप कमी होण्यास मदत होईल. गोव्यातील नियोजित विद्यापीठासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा म्हणून आपण केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा केली आहे. सुमारे साडेपाचशे कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. सेंद्रीय कृषी विद्यापीठाची कल्पना ही आपणच पुढे आणली व त्या कल्पनेचा पाठपुरावाही केला. मुख्यमंत्रीही खूप अनुकूल आहेत, असे कवळेकर यांनी सांगितले. विद्यापीठाचे स्वप्न साकार होईल असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.
सेंद्रीय कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव मार्गी लागेल - बाबू कवळेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 1:30 PM