विशांत वझे लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली मतदारसंघात सुमारे एक हजार कोटीच्या विकासकामांना चालना दिली जात असून काही प्रकल्प सुरू आहेत. आगामी दोन वर्षात मतदारसंघ अधिक आदर्श करण्याचा ध्यास आहे. प्रत्येक घरात समृद्धी, डिचोली आदर्श व रोल मॉडेल करण्याच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री व आमची जनता यांची पूर्ण साथ असल्याचे डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.
आमदार म्हणून तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर डॉ. शेट्ये यांच्या तीन वर्षांतील कार्याचा आढावा घेतना त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आपण त्याच वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठिंबा जाहीर केला. तेव्हापासून माझे भाजप सरकारला पूर्ण सहकार्य असून तीन वर्षांत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळालेली आहे, याचे समाधान आहे, असे डॉ. शेट्ये म्हणाले.
अडवलपाल येथे तीन कोटींचा क्रीडा प्रकल्प, मूळगाव येथे दीनदयाळ योजनेअंतर्गत तीन कोर्टीच्या क्रीडा प्रकल्पाचे नियोजन आहेत. आमठाणे धरण परिसराचे सुशोभीकरण, हाऊसिंग बोर्ड येथे इनडोअर स्पोर्टसाठी फुटसालचे काम सुरू आहे. मोपा कनेक्टिव्हिटीसाठी लाटंबार्से वसाहत ते मोपा एअरपोर्ट रस्ता, नियोजन करण्यात आले आहे. बालोद्यान रोटरी उद्यान आदी कामे पूर्ण झाली आहेत. वीज व्यवस्थेत आमूलाग्र बदल व सुधारणा घडवून आणताना शहर व पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्यांची कामे पूर्ण होत आहे. तसेच अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर पथदीप सुविधा देण्यात येत आहे. डिचोलीत बहुउद्देशीय क्रीडा प्रकल्प उभारण्याचा संकल्प आहे. तो आगामी दोन वर्षांत मूर्त स्वरूपात येईल, असे आमदार शेट्ये यांनी सांगितले.
रस्त्यांचे जाळे विणताना सर्व रस्ते हॉटमिक्स चकाचक करण्यावर भर देण्यात आलेला असून बहुतेक ग्रामीण व गावातील रस्त्यांना चालना देण्यात आलेली आहे. प्रत्येक घरात समृद्धी, प्रत्येक हाताला काम, महिला सबलीकरण, युवकांना रोजगार, स्वावलंबनाचे धडे याबरोबरच समूह शेती, तसेच धवल आणि हरितक्रांतीच्या उत्कर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असेही शेट्ये यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे विकासासाठी मिळतेय सहकार्य
विकासाच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री हे सतत सकारात्मक आहेत. मुख्यमंत्र्यांमुळेच आज एक हजार कोटीपर्यंतचे प्रकल्प या मतदारसंघात राबविण्यात येत असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. राजकारण हे समाजकारणाचे एक प्रमुख माध्यम आहे. त्या माध्यमातून जनतेशी सतत जोडले जाता येते या भावनेनेच आम्ही राजकारणात कार्यरत आहोत असेही डॉ. शेट्ये यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पर्यावरण सांभाळून तसेच जो निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे तो पुनर्जीवित करण्यासाठी वृक्षलागवड व अनेक उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नवे प्रकल्प कार्यान्वित
मुळगाव येथे ईएसआय हॉस्पिटल, डिचोलीत सुसज्ज भव्य प्रशासकीय प्रकल्प, सभागृह, साळ येथे भव्य बेराज व रॉ-वॉटर पम्पिंग स्टेशन, धुमासे-मेणकुरे येथे नवा जलप्रकल्प. लाटंबार्से येथे औद्योगिक वसाहतीच्या कामाला चालना, २० एमएलडी प्रकल्पातून ५ एमएलडी आयडीसीसाठी, कृषी विकास योजना नियोजित आहेत. पाण्याच्या संदर्भात नियोजन करताना पुढील ३५ वर्षांच्या पाण्याची गरज ओळखून मतदारसंघात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी ही विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. साळ पुनर्वसन वसाहत आदर्श पुनर्वसन करण्यात व त्यांना पूर्ण मालकी हक्क देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे, असे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.
दिलेला शब्द पाळण्यावर कायम
मतदारसंघात भाजप संघटनकार्यातही आमदार डॉ. शेट्ये सक्रिय असून त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रामाणिक काम करीत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यास आपण तयार आहे. त्याबाबत पक्षनेत्यांनी भूमिका घ्यावी.
मुख्यमंत्री सावंत यांना पूर्ण पाठिंबा असून दिलेला शब्द कायम राखणे हे तत्त्व आहे. त्याच दृष्टीने भाजपबरोबर राहून तीन वर्षे काम करीत आहे. विकासाची गती जलद आहे. काही प्रकल्प रखडले आहेत. ते तातडीने पूर्ण करण्यासाठी आमचे लक्ष आहे, असे डॉ. शेट्ये म्हणाले.
शिक्षा व्हिजनमार्फत आम्ही शिक्षण, संस्कार, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रात सतत सहकार्य करताना अनेक उपक्रम अनेक वर्षांपासून राबवीत आहोत. याअंतर्गत ग्रामीण व शहरी मुलांना उत्तेजन देण्यासाठी शिष्यवृत्ती देणे गरजूंना शिक्षण आरोग्य निवारा यासाठी मदत करणे, तसेच इतर क्षेत्रातही कार्य सुरू असल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.