लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : आध्यात्मिक जीवनात प्रत्येक माणसाचा निसर्गाशी संबंध येतो. माणसाचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या जीवनात निगडित असलेल्या वनस्पतींचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत आमदार, तसेच सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.
कुमड शिरोडा येथील येथील योग प्रभा भारती सेवा संस्थांच्या समर्पण आश्रम गोवाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार श्रीपाद नाईक, संस्थेचे प्रमुख आचार्य नवदाच नाईक, दक्षिण भारत प्रबंधक राजेंद्र गावणेकर, आश्रमचे व्यवस्थापक नीलेश कवळेकर, आश्रम व्यवस्थापक सुप्रिया पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक पालेकर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीपाद नाईक यांनी सांगितले, आपले जीवन घडवण्याचे काम गुरू करत असतो. आपल्या जीवनाचा भवसागर पार करताना गुरुच्या मार्गदर्शनाची आपल्याला गरज असते. तेव्हाच कुठे आपले जीवन सुसह्य होते. आपण समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवून प्रत्येकाने समाजकार्य करावे. यावेळी सुप्रिया परमार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विराज प्रभू देसाई, वंदना नाईक यांनी सूत्रसंचालन केले.