पणजी: श्रीलंकेत झालेल्या चर्चमधील अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली हे. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक बोलवून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
पणजी मुख्यालयात गुरूवारी उत्तर व दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात या बैठकीत उत्तर व दक्षिण गोव्याचे अधीक्षक उपस्थित होते. त्यांनी हॉटेल व्यावसायिकांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या बैठकीत हॉटेल व्यावसायिकांबरोबरच कॅसिनोंचे प्रतिनिधी, सुरक्षा एजन्सींचे प्रतिनिधी व इतर व्यावसायिकांचा समावेश होता.
हॉटेलमध्ये आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती व ओळखपत्रे ठेवणे, तसेच सीसीटीव्हीचे सर्व्हेलन्स ठेवणे आणि इतर सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. पोलिसांना महत्त्वाच्या व संशयास्पद गोष्टींची माहिती देण्यास सांगितले आहे. उत्तर गोव्यात सार्वजनिक ठिकाणी अनेक खाजगी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. गरज भासल्यास त्या सीसीटीव्हींचे रेकॉर्डिंगही पोलीस मागविणार असल्याचे पोलीस अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक पंकज कुमार सिंग, उत्तर गोव्याचे अधीक्षक चंदन चौधरी व दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस या बैठकीला उपस्थित होते.
या शिवाय पोलीसांची वेगली व्यवस्था असणार आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या स्थळांना सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच बॉम्ब विरोधी पथकही तयार ठेवण्यात आले आहे.