पणजी : दक्षिण मध्य रेल्वेने गोव्यात रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करू नये म्हणून गोव्यातील एनजीओ आणि विरोधी राजकीय पक्षांच्या सहभागाने दक्षिण गोव्यातील चांदर येथे रविवारी मोठे आंदोलन झाले. सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेस व अन्य पक्षांचेही कार्यकर्ते रात्रभर रेल्वे रुळावर बसून राहिले. सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आणखी शेकडो लोक त्यात सहभागी झाले. आंदोलन करण्यात आले व दुपदरीकरण काम सुरू करण्याचा प्रयत्न तूर्त उधळून लावला गेला. दक्षिण मध्य रेल्वेचा एक मार्ग गोव्यात पोर्तुगीज काळापासून आहे. या मार्गावरून कोळशाची मोठ्या प्रमाणात वाहतूक मुरगाव बंदरापर्यंत होते. रेल्वे रुळालगत घरे असलेल्या गोमंतकीयांना त्यामुळे प्रदूषणास तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर आता रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण नको, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. अदानी कंपनीची कोळसा वाहतूक वाढविण्याच्या हेतूने हे दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आणला गेला.
विरोधी पक्षाचा आंदोलनाला पाठिंबाविरोधी पक्षनेते दिगंबर कामत व अन्य आमदारांनी आंदोलनास पाठिंबा देत आंदोलनात रविवार व सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. गोंयांत कोळसो नाका या संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. रात्रभर व पहाटे शेकडो लोकांनी रेल्वे रुळावर बसून राहण्यासारखे कल्पक आंदोलन गोव्यात प्रथमच घडले आहे.