पणजी - हिंदी साहित्यिक असलेल्या गोव्याच्या राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्यावर गोव्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते प्रथमच खूप नाराज झालेले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाच्या काळात सारे प्रशासन ठप्प झाल्याची टीका मंत्री व आमदारही करत आहेत. विरोधी पक्षाने या विषयावरून रान उठविलेले असताना राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा मात्र शांत आहेत. त्या कोणताच निर्णय घेत नसल्याने त्यांना राज्यपालपदी राहण्याचा अधिकारच नाही अशी टीका करत हायकोर्टाचे वकील व सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी संताप व्यक्त केला.
पर्रीकर सचिवालयात येत नाहीत. मंत्रिमंडळाच्या नियमितपणो बैठकाही होत नाहीत. मुख्यमंत्री लोकांना भेटत नाहीत. पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा दुसऱ्या एखाद्या मंत्र्याकडे सोपवावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी व विरोधी काँग्रेसने नुकताच पर्रीकर यांच्या करंजाळे येथील खासगी निवासस्थानी मोर्चा नेला. आपल्याला पर्रीकर यांना भेटायचे आहे असे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले पण पोलिसांनी मोर्चा अडवला व त्यांना भेटू दिले नाही.
पणजीतील आझाद मैदानावर आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी ठप्प प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषण चालवले आहे. नऊ दिवस उपोषण सुरू आहे. विविध कार्यकर्त्यांनी घाटे यांना पाठींबा दिला. पर्रीकर सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी गोवा विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे यापूर्वी वारंवार केली पण राज्यपालांनी दखल घेतलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी आता सभेचे आयोजन केले आहे. गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग असताना राज्यपाल काहीच करत नसल्याने आम्ही राज्यपालांच्याही विरोधात आता मोहीम राबवू, असे आयरिश राड्रीग्ज यांनी स्पष्ट केले आहे.